डहाणूत जागतिक मृदा दिन साजरा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 11:56 PM2019-12-09T23:56:11+5:302019-12-09T23:56:37+5:30
तालुका कृषि अधिकारी संतोष पवार यांनी जमीन आरोग्य पत्रिका वाचन करून आरोग्य पत्रिकेनुसार खत व्यवस्थापन कसे करावे यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
डहाणू: गोखले एज्युकेशन सोसायटीचे कृषी विज्ञान केंद्र कोसबाड हिल आणि तालुका कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वासगाव जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्रातील मृदा शास्त्रज्ञ अशोक भोईर यांनी जमिनीची धूप होण्याची कारणे, त्यावर उपाययोजना तसेच माती परीक्षणाचे महत्त्व यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. बेसुमार वृक्षतोड व शहरीकरण तसेच जास्त पावसाने जेव्हा जमिनीची धूप होते त्या वेळी मातीचा सुपीक थर वाहून जातो व जमिनीचा पोत कमी होतो. यावर भातशेताचे मसगीकरण, शेताला आडवी नांगरणी, आच्छादन, आंतर मशागत, आंतर पीक पद्धती, मिश्रशेती, जल आणि मृद संधारण इत्यादी उपाययोजना करण्याचे त्यांनी सुचविले.
तालुका कृषि अधिकारी संतोष पवार यांनी जमीन आरोग्य पत्रिका वाचन करून आरोग्य पत्रिकेनुसार खत व्यवस्थापन कसे करावे यावर सविस्तर मार्गदर्शन केले. पीक संरक्षण शास्त्रज्ञ उत्तम सहाणे यांनी कीडनाशकाची हाताळणी व कीड रोग नियंत्रणाबद्दल सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात १०० जमीन आरोग्य पत्रिकेचे वितरण केले. या कार्यक्र माला कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ प्रा. अनुजा दिवटे व प्रा. रजिवाना उपस्थित होत्या.