जिल्ह्यात महाशिवरात्री उत्सव जल्लोषात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 11:31 PM2020-02-21T23:31:22+5:302020-02-21T23:31:41+5:30
प्रशासनाची व्यवस्था चोख : तुंगारेश्वरला दोन लाख भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ
पारोळ : पालघर जिल्ह्यात महाशिवरात्री उत्सव भाविकांच्या अफाट उत्साहात जल्लोषात साजरा झाला. वसई तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थस्थळ असलेल्या तुंगारेश्वर पर्वतावर गुरुवारी रात्री १२ वाजल्यापासूनच भाविकांनी दर्शनासाठी लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या. सुमारे दीड ते दोन लाख भाविकांनी महाशिवरात्रीच्या संपूर्ण दिवसात तुंगारेश्वर पर्वतावर भगवान महादेवांचे दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली. वसई तालुक्यातील वसई, विरार आणि नालासोपारा तसेच आजूबाजूच्या गाव परिसरातील प्रसिद्ध शिवालयांतही भाविकांनी सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. महाशिवरात्रीचे निमित्त साधून ठिकठिकाणी यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
वसई पूर्वेतील सातिवली येथील तुंगारेश्वर पायथ्यापासून गुरुवारी रात्रीपासूनच भाविकांनी तुंगारेश्वराच्या दिशेने प्रस्थान करण्यास सुरुवात केली होती. वसई-विरार शहर महापालिकेच्या परिवहन सेवेने आणि एस.टी. महामंडळाच्या परिवहन सेवेने आपआपल्या आगारांतून बसगाड्यांची सोय उपलब्ध ठेवली होती. महाशिवरात्रीच्या संपूर्ण दिवसात वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन बसेसने तर ८०० फेऱ्या पूर्ण करून भाविकांना सहकार्य केले. एस.टी. महामंडळानेदेखील गाड्यांची उपलब्धता ठेवल्याने भाविकांना तुंगारेश्वर पर्वतावर इच्छित वेळेत पोहोचता आले. सध्या हिवाळा संपून उन्हाळा ऋतूचा प्रारंभ झाला असल्याने तुंगारेश्वर पर्वत चढताना दमछाक होणाºया भाविकांच्या सेवेसाठी सेवाभावी संस्था आणि मंडळांनी शीतपेय, चहा, नाश्त्याचे मोफत वाटप केले. तुंगारेश्वर येथे भंडाºयाचेदेखील आयोजन करण्यात आले होते. विरार पूर्वेतील ईश्वरपुरी या ठिकाणी सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. यंदाही या ठिकाणी भंडाºयाचे आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. चांदीप गावातील ग्रामस्थांनी भाविकांची गैरसोय होणार नाही या अनुषंगाने चोख व्यवस्था ठेवली होती. तर मंदिर व्यवस्थापनाकडूनही भाविकांसाठी चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती.
पोलीस बंदोबस्त तैनात
च्महाशिवरात्री सणाला कोणतेही गालबोट लागू नये यासाठी पोलीस बंदोबस्त, वन विभागाचे कर्मचारी आणि महापालिकेचे कर्मचारी तसेच होमगार्ड ठिकठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते.
च्विरार पूर्वेतील पारोळ येथील प्राचीन शिवमंदिर, विरार फाटा येथील शिवमंदिर, शिरवली येथील श्री तानसेश्वर मंदिर, पापडी येथील श्री हरिहरेश्वर मंदिर, वसई गावातील ऐतिहासिक शिवमंदिर, वसई पूर्वेतील श्री काशीविश्वेश्वर, सातिवली येथील शिवमंदिर, जूचंद्र सोमेश्वरनगर येथे भाविकांनी रांगा लावल्या होत्या.