पाड्यातील आदिवासींनी साकारली श्रमदानातून स्मशानभूमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 02:35 AM2018-02-06T02:35:35+5:302018-02-06T02:35:40+5:30
गेली अनेक वर्षे दगडावरच चिता रचून कसेबसे अंत्यसंस्कार करण्यास कंटाळलेल्या आदिवासींनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने श्रमदानातून स्मशानभूमीत चिता रचण्याचा लोखंडी स्टँड व अन्य सुविधा उभारून ती साकार केली
वसई : गेली अनेक वर्षे दगडावरच चिता रचून कसेबसे अंत्यसंस्कार करण्यास कंटाळलेल्या आदिवासींनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने श्रमदानातून स्मशानभूमीत चिता रचण्याचा लोखंडी स्टँड व अन्य सुविधा उभारून ती साकार केली व इतरांपुढे नवा आदर्श निर्माण केला.
नालासोपारा पश्चिमेकडील गास गावात कोलबांव, इंद्राणी, वराला, चिचपाडा, दिव्हादपाडा असे आदिवासी पाडे असून त्यांची लोकसंख्या तीन हजारांहून अधिक आहे. त्यांच्यासाठी बंदरवाडी येथे सरकारी खाजण जमिनीवर ब्रिटीशकालापासून स्मशानभूमी आहे. आर्थिक हलाखीमुळे पूर्वी येथे अंत्यसंस्कार करण्याऐवजी दफन केले जात होते. लाकडे उपलब्ध होऊ लागल्यानंतर दगडांचा थर रचून त्यावर चिता रचली जात होती. १९८२ साली गास ग्रामपंचायतीने पहिल्यांदाच स्टँड उभारला. तो मोडल्यानंतर दुसरा उभारला तो ही चोरीला गेल्यावर तिसरा बसविण्यात आला होता. वसई विरार महापालिका अस्तित्वात आल्यानंतर तो ही गंजून भंगार झाला होता. नवा स्टँड बसवण्यासाठी पाड्यातील लोकांनी महापालिकेकडे मागणी केली होती. २३ फेब्रुवारी २०१७ रोजी सभापती पंकज चोरघे यांनी तो बसवून दिला होता. मात्र, अवघ्या महिन्याभरातच १९ मार्चला महापालिकेने तो काढून नेला. त्यामुळे ब्रिटीशांच्या काळात होत होते तसे दगडावर चिता रचून अंत्यसंस्कार करण्याची पाळी पुन्हा एकदा येथील स्थानिकांवर आली होती.
स्टँड काढून नेल्यानंतर आदिवासी पाड्यातील माजी सरपंच चंद्रकांत वळवी, सालू अल्मेडा, पोलीस पाटील सोन्या वळवी यांनी महापौर प्रविणा ठाकूर यांची १७ जुलैला भेट घेतली होती. स्टँड नसल्यामुळे भर पावसात चिखलात अंत्यसंस्कार करावे लागत असल्याची व्यथा त्यांनी मांडली होती. त्यावेळी त्यांनी कार्यकारी अभियंता आणि नगर अभियंत्यांना तात्काळ तो स्टँड बसवण्याचे आदेश दिले होते. असाच आदेश महापौरांनी या दोन्ही अधिकाºयांना १ आॅगस्टला पुन्हा एकदा दिला होता. पण, तो बसविला गेला नाही.
१८ आॅगस्टला आमदार हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे व्यथा मांडण्यात आली होती. त्यांनीही महापालिका अधिकाºयांना तात्काळ तो बसवण्याचे आदेश दिले होते. परंतु, अद्यापपर्यंत तो बसविण्यात आला नाही. उलट त्याचा आणि स्मशानभूमीचा नाद सोडा त्याऐवजी अॅम्बुलन्सची व्यवस्था करून दिली जाईल. पार्थीव अॅम्बुलन्समधून भुईगावाच्या स्मशानभूमीत न्या आणि अंत्यसंस्कार करा, असा सल्ला अधिकारी देत असल्याचा येथील ग्रामस्थांचा आरोप आहे.
त्यामुळे ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून व श्रमदानातून हा स्टँड बसविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी घरटी दोनशे रुपये प्रमाणे १८ हजार रुपये जमा झाले. त्यातून हे काम झाले.