स्मशानभूमीच मोजताहेत शेवटच्या घटका, भिंती तुटलेल्या, पत्रे गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 12:31 AM2020-01-21T00:31:29+5:302020-01-21T00:32:32+5:30
स्मशानभूमीच्या भिंतीच्या प्लास्टरमधील गंजलेल्या लोखंडी सळया, वरून खाली पडत असलेले प्लास्टर आणि धोकादायक परिस्थितीमधील भिंतींमुळे भविष्यात जीवघेणी दुर्घटना घडू शकते
नालासोपारा : वसई-विरार शहर महानगरपालिकेने बांधलेली स्मशानभूमीच सध्या शेवटच्या घटका मोजत असल्याचे निदर्शनास येत आहे. स्मशानभूमीच्या भिंती तुटलेल्या, पत्रे गायब आहे. अंत्यविधीसाठी जाणारा रस्ता सुद्धा व्यवस्थित नसल्याने सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रदूषण रोखण्यासाठी आणि इंधनाची बचत करण्यासाठी स्मशानभूमीत इलेक्ट्रिक शवदाह मशिन्स आहेत, मात्र नियमित देखरेख न केल्याने धूळ खात पडलेली आहे. स्मशानभूमीच्या भिंतीच्या प्लास्टरमधील गंजलेल्या लोखंडी सळया, वरून खाली पडत असलेले प्लास्टर आणि धोकादायक परिस्थितीमधील भिंतींमुळे भविष्यात जीवघेणी दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या स्मशानभूमीची अवस्था इतकी खराब आणि धोकादायक झाली आहे की, अंत्यसंस्कार करण्यासाठी येणाऱ्या रहिवाशांना छताचे प्लास्टर त्यांच्या अंगावर पडून कोणती दुर्घटना तर होणार नाही ना, अशी भीती वाटत असते. कित्येक वर्षांपासून या दिवाळांची डागडुजी न झाल्याने छताचे सिमेंट लावलेले प्लास्टर पडत आहे. त्याचबरोबर भिंतीना मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. पावसाळ्यात तर मोठी कठीण परिस्थिती असते. रस्त्यावरील चिखल, तुटलेले व फुटलेले छप्पर आणि कुठे कुठे तर छप्परच नसल्याने भिजलेल्या लाकडांमुळे मृतदेह जाळण्यासाठी बरीच मेहनत करावी लागते. नालासोपारा पूर्व आणि पश्चिमेकडील स्थानिक नागरिकांनी सांगितले की, इलेक्ट्रिक शवदाह मशिनींमध्ये मृतदेहाचे अंत्यसंस्कार केल्यावर त्यांच्या चिमणीमुळे आजूबाजूच्या परिसरात धूर आणि दुर्गंधी येत नाही. पण त्या मशीन आता बिघडल्याने रॉकेल किंवा इतर इंधन वापरून मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्यावर धुरामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होते. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात राहणाºया सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
धूळखात पडलेल्या इलेक्ट्रिक मशिन्स
वसई-विरार महानगरपालिकेने २०१४ साली हद्दीमधील चार स्मशानभूमीत गॅस आणि इलेक्ट्रिक शवदाह योजना सुरू केली होती. यावर महानगरपालिकेने एक कोटी २० लाख रुपये खर्च केले होते, पण तीन वर्षातच ही योजना बारगळली आहे. सध्या तर महानगरपालिकेचे अधिकारी व कंत्राटदार यांच्या दुर्लक्षामुळे गॅस आणि इलेक्ट्रिक शवदाह मशिनी खराब होऊन भंगार अवस्थेत पडून आहेत. या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी येणाºया लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. कधी कधी तर दोन मृतदेह एकाच वेळी आल्याने त्यांना तासन्तास अंत्यविधीसाठी वाट पाहावी लागते.
निवडणुकांनंतर पडतो मुद्याचा विसर
३० लाख लोकसंख्येच्या वसई-विरार महापालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी स्मशानभूमी ही मोठी समस्या आहे. अंत्यसंस्कार करण्यासाठी येणारे नागरिक महापालिकेला तक्रारी करत आहेत. उत्तम आणि सुव्यवस्था असलेली स्मशानभूमी आणि दफनभूमीची व्यवस्था करण्यात यावी, अशी या नागरिकांची मागणी आहे. सत्ताधारी पक्षाचे नेते मंडळी निवडणुकीच्या वेळी हा मुद्दा प्रचारात घेतात आणि निवडून आल्यावर हा मुद्दा विसरूनही जातात.
महापालिका क्षेत्रातील फुलपाडा, मनवेलपाडा, तुळिंज आणि समेळपाडामधील स्मशानभूमीच्या डागडुजीसाठी २५-२५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. लवकरच काम सुरू करण्यात येईल.
- राजेंद्र लाड, सार्वजनिक बांधकाम
अभियंता, वसई-विरार महानगरपालिका.
अंत्यसंस्कार करण्यासाठी गेल्यावर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. महानगरपालिका लाखो रुपये खर्च केल्याचा दावा करते, पण अनेक वर्षांपासून स्मशानभूमींची परिस्थिती जशी होती तशीच आहे.
- मयूर सकपाळ, स्थानिक रहिवासी
वसई-विरार महापालिकेच्या हद्दीमध्ये नागरिक जिवंत काय, मयत काय, फक्त त्यांना लुटण्याचे काम केले जात आहे. स्मशानभूमीची खराब परिस्थिती चिंतेचा विषय बनला आहे.
- मनीषा वाडकर, संतप्त महिला