मध्य आणि पश्चिम रेल्वेला मराठीचे वावडे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 11:04 PM2020-02-26T23:04:01+5:302020-02-26T23:05:23+5:30
ट्वीटला मराठीत उत्तराची मागणी
डोंबिवली : रेल्वे प्रशासन अन्य प्रांतांमध्ये प्रवाशांनी टिष्ट्वट केल्यास त्या भागातील बोलीभाषा, मातृभाषेमध्ये उत्तर देते, परंतु मुंबई आणि उपनगरांमध्ये मध्य असो की पश्चिम रेल्वे, प्रवाशांनी टिष्ट्वट करून समस्या विचारल्यास अथवा माहिती विचारल्यास प्रवाशांना मराठीत उत्तर का देत नाही? रेल्वेला येथेच मराठीचे वावडे का आहे? असा सवाल डोंबिवलीचे रेल्वे प्रवासी मंदार अभ्यंकर यांनी विचारला आहे.
अभ्यंकर यांनी सातत्याने ७४ दिवस रेल्वे प्रशासनाकडे टिष्ट्वटरद्वारे यासंदर्भात विचारणा केली. अभ्यंकर यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल, मध्य व पश्चिम रेल्वेचे डीआरएम तसेच रेल्वे अधिकाऱ्यांना यासंदर्भात टॅग केले. वानगीदाखल त्यांनी गुजराती भाषेत रेल्वेने टिष्ट्वटरवर माहिती उपलब्ध केल्याचे दाखले दिले. परंतु, ज्या पद्धतीने गुजरातीमध्ये माहिती दिली जाते, तशी मराठीमध्ये दिली जात नसल्याचे ते म्हणाले. अभ्यंकर हे डोंबिवली येथून मुंबईच्या दिशेने जाणारी पहाटेची पहिली जलद लोकल पकडतात. त्यादरम्यान काही समस्या असल्यास, ते टिष्ट्वट करून रेल्वे प्रशासनाला टॅग करतात. पण, प्रशासनाकडून त्यांना इंग्रजीमध्ये रिप्लाय येत असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी टिष्ट्वटला मराठीत उत्तर दिले जाणे अपेक्षित आहे, पण तसे होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. अधूनमधून मराठीत टिष्ट्वट करते, पण त्यात सातत्य असायला हवे.
मध्य रेल्वे प्रशासन बहुतांश वेळा मराठीतच उत्तर देते. काही महिन्यांपासून तर रविवारच्या मेगाब्लॉकसह अन्य माहिती देणारी प्रसिद्धिपत्रके इंग्रजी, हिंदी आणि मराठीत देण्यात येत आहेत.
- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे