आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सेंट्रलाईज्ड किचनचे डबे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 10:57 PM2019-06-18T22:57:42+5:302019-06-18T22:57:45+5:30
दोनवेळा नाश्ता, दोनवेळा जेवण; आता मिळणार सकस, स्वच्छ, गरमा-गरम पोषक आहार
जव्हार : जव्हार प्रकल्पातील आदिवासी आश्रम शाळांना सोमवारपासून आदिवासी विकास विभागाने सेंट्रलाईज किचनमधून डबे देण्यास प्रारंभ केला आहे. यामुळे त्यांना चांगल्या प्रतीचे जेवण मिळणार असून, गेल्या अनेक वर्षांची समस्या मिटणार आहे.
जव्हार आदिवासी प्रकल्पातील २५ आश्रम शाळांतील विद्यार्थ्यांना सोमवारपासून सेंट्रलाईज््ड किचनकडून डबे पुरविण्यात येत आहेत. तसेच यापैकी काही आश्रम शाळांना विक्रमगड व वाडा व डहाणू येथील सेंट्रलाईज किचन मधून हा पुरवठा होतो आहे. त्यामुळे आता डब्बे पद्धत सुरु झाल्याने चांगले जेवण, गोड पदार्थ मिळणार असल्याने मुलांचे आरोग्य सुधारणार आहे. असे आश्रम शाळेतील अधीक्षकांनी सांगितले.
जव्हार प्रकल्पात विनवळ येथे सेंट्रलाईज किचन सुरु करण्यात आले आहे. यामध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, ३ वाजता नाश्ता आणि संध्याकाळी जेवण अशा पद्धतीचे डबे सुरु केले आहेत. जेवणात भात, पोळी, दोन भाज्या, पापड, लोणचे, काकडी, याचा समावेश असतो. सेंट्रलाईज्ड किचनकडून सुरु करण्यात आलेला हा उत्तम प्रतीचा आहार घेतल्यावर मुलांनाही समाधान व्यक्त केलं.
आदिवासी विकास प्रकल्प १९७२ पासून सुरु झाल्यानंतर मागावर्गीय भागात निवासी आश्रम शाळा सुरु करण्यात आल्या. मात्र आश्रम शाळा सुरु झाल्यापासून आजपर्यंत लाकडांच्या चुलीवर जेवण, नाश्ता, पोळी, भात, भाजी बनविले जात होते त्यानंतर ते गॅसवर बनविले जाऊ लागले मात्र तरीही विद्यार्थ्यांना व्यवस्थितरित्या जेवण मिळत नसल्याच्या अनेक तक्र ारी यायच्या. तसेच आश्रम शाळेतील जेवणाबाबत राजकारणही झाले. मात्र सोमवारपासून प्रत्येक आश्रम शाळांत डबे सुरु झाले आहेत. त्याव्दारे जेवण चांगलेच मिळत असल्याने वसतिगृहातील मुलांनी समाधान व्यक्त केले आहे.