कोरोनाची साखळी तोडण्याचे आव्हान, पालघर जिल्ह्यात जनजागृतीवर मोठा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 12:09 AM2020-07-16T00:09:33+5:302020-07-16T00:10:00+5:30

कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी लॉकडाऊन करण्याबरोबरच जनजागृतीवर लाखो रुपये खर्च केल्यानंतरही नागरिकांवर फारसा परिणाम झालेला नसल्यामुळेच कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.

The challenge of breaking the corona chain, a huge expense on public awareness in Palghar district | कोरोनाची साखळी तोडण्याचे आव्हान, पालघर जिल्ह्यात जनजागृतीवर मोठा खर्च

कोरोनाची साखळी तोडण्याचे आव्हान, पालघर जिल्ह्यात जनजागृतीवर मोठा खर्च

Next

- हितेन नाईक

पालघर : पालघर जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून बुधवारी दुपारपर्यंतच्या आकडेवारीनुसार, रुग्णांची संख्या १० हजारांच्या वर गेलेली आहे, तसेच जिल्ह्यात १८८ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी लॉकडाऊन करण्याबरोबरच जनजागृतीवर लाखो रुपये खर्च केल्यानंतरही नागरिकांवर फारसा परिणाम झालेला नसल्यामुळेच कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन दिवसरात्र एक करीत असताना बिनकामाचे बाहेर पडणाऱ्या काही बेपर्वा नागरिकांमुळे गर्दी वाढत असून जिल्ह्याबाहेरून नोकरीनिमित्ताने जिल्ह्यात ये-जा करणाºया नागरिकांमधून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून आले आहे. अत्यावश्यक कामासाठी दिलेल्या पासेसचा गैरवापरही कोरोनाच्या वाढीसाठी कारणीभूत ठरत आहे. जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्या एकत्रित प्रयत्नातून आपण कोरोनाविरोधातील लढाई जिंकू शकतो, अन्यथा मार्चपासून सुरू असलेली लॉकडाऊनची अविरतपणे सुरू असलेली साखळी हनुमानाच्या शेपटीसारखी वाढत गेल्यास जिल्ह्यातल्या विकासाच्या प्रक्रियेला खीळ बसण्याचा धोका वाढू शकतो.
जिल्हा नियोजन समिती (डीपीडीसी) आणि आपत्ती व्यवस्थापनांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाला कोरोना प्रादुर्भाव रोखणे आणि उपाययोजना आखण्यासाठी आणि परप्रांतीय कामगारांना रेल्वेने त्यांच्या मूळगावी पाठविण्यासाठी रेल्वेगाड्यांची व्यवस्था करणे, जेवण, नाश्ता, पाणी आदीच्या खर्चासाठी एकूण १६ कोटींचा निधी मिळाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. त्या निधीतून वसई-विरार महापालिकेला पाच कोटी २५ लाखांचा सर्वाधिक निधी देण्यात आला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाला एक कोटी ४० लाख (अन्य तीन कोटी २२ लाख मिळाले), जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाला ५८ लाख १२ हजार निधी देण्यात आला आहे. वसई तालुक्यात दोन कोटी ६५ लाख २५ हजार ९३९ रुपये, पालघर ६८ लाख ३७ हजार १८५, मोखाडा १२ लाख ५२ हजार ६८२, जव्हार तीन लाख ७० हजार २७६, विक्रमगड चार लाख ८४ हजार २९२, डहाणू १२ लाख ७३ हजार ९६७, वाडा आठ लाख २५ हजार २४२, तर तलासरी १० लाख ७२ हजार ३३ रुपयांचा निधी वितरित करण्यात आलेला आहे.
२२ मार्चदरम्यान देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करीत जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व सेवा बंद करण्यात आल्या. त्या वेळी पालघर जिल्ह्यात लक्षणे आढळलेले अवघे २० रुग्ण होते. एप्रिलमध्ये ११० पॉझिटिव्ह, १० मृत्यू, मे मध्ये जवळपास आठपट वाढत रुग्णसंख्या ८४७, तर २९ मृत्यू अशी स्थिती होती. या आकडेवारीत वसई-विरार महापालिकेची कोरोनाबाधितांची संख्या ७८८ पॉझिटिव्ह आणि २९ मृत्यू अशी होती. तर, सध्या वसई-विरारमध्ये हीेच संख्या आठ हजार ५४७ बाधित रुग्ण, तर मृत्यू १७४ अशी स्थिती आहे. वसई तालुक्यातील वाढत्या संख्येने जिल्ह्यातील प्रशासनाला मात्र वेठीस धरले. वसई, नालासोपारा आदी भागांत नोकरी, व्यवसायानिमित्ताने जाणाऱ्यांच्या माध्यमातून मग जिल्ह्यातील ग्रामीण भाग कोरोनाच्या कचाट्यात सापडू लागला. आता जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे प्रशासनापुढे चिंतेचे वातावरण आहे.

बाधितांमध्ये तब्बल पाचपटींनी वाढ

- पालघर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या मार्च महिन्यापासून हनुमानाच्या शेपटीसारखी हळूहळू वाढतच चालली आहे. १४ जून रोजी जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या अवघी एक हजार ९०० आणि ६१ मृत्यू अशी होती, मात्र त्या संख्येत तब्बल पाचपटीने वाढ होत नऊ हजार ७३३ बाधित आणि १८१ मृत्यू इथपर्यंत पोहोचली आहे.

- मग, मार्चपासून जवळपास पाच महिन्यांच्या कालावधीत बाधितांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यात काय उणिवा राहिल्या, यावर अभ्यास करून नियोजनबद्ध आराखड्यांची अंमलबजावणी करणे गरजेचे बनले आहे.

Web Title: The challenge of breaking the corona chain, a huge expense on public awareness in Palghar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.