भाजपापुढे जागा राखण्याचे आव्हान; विकासाची पाटी कोरीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 10:50 PM2019-03-15T22:50:22+5:302019-03-15T22:50:35+5:30
तीन विधानसभा मतदारसंघांत तालुका विभागल्याने झाले दुर्लक्ष
- वसंत भोईर
वाडा तालुका दोन लोकसभा तीन विधानसभा क्षेत्रांमध्ये विभागला गेल्याने तालुक्याला दोन खासदार, तीन आमदार आहेत. २०१४ च्या निवडणुकीत येथील मतदारांनी भाजपाच्या पारड्यात मते टाकून दोन खासदार विजयी केले. तर भाजपा शिवसेना व राष्ट्रवादी या पक्षाचे आमदार निवडून दिले. मात्र, दोन खासदार तीन आमदारांचा हा तालुका पोरका असून त्याला कोणीही वाली नसल्याने तालुक्याची विकासाची पाटी कोरीच राहिली आहे. त्यामुळे भाजपावर तालुक्यातील मतदारांचा नाराजीचा सूर असून आगामी निवडणुकीत त्याचा फटका दोन्ही खासदारांना बसेल असे चित्र दिसत आहे.
तालुक्यात एकूण ८६ ग्रामपंचायती असून १६५ गावे व दोनशेहून अधिक पाडे समाविष्ट आहेत. त्यातील भिवंडी लोकसभेत ११९ मतदान केंद्राचा समावेश आहे. पालघर लोकसभेत ४६ मतदान केंद्र समाविष्ट आहेत. आगामी निवडणुकीत २०१४ च्या निवडणुकी सारखी मोदी लाट नसल्याने चुरशीच्या होणाऱ्या या निवडणुकीत वाडा तालुक्यातील मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. तर वर्षभरापूर्वी वनगांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचे खासदार राजेंद्र गावित हे विजयी झाले असले तरी या भागातील विकास कामे करण्यात त्यांनाही अपयश आले आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत वाड्याच्या मतदारांनी भिवंडी ग्रामीण विधानसभा क्षेत्रात शिवसेनेच्या शांताराम मोरे , विक्र मगड विधानसभेत विष्णू सवरा व शहापूर विधानसभेमध्ये राष्ट्रवादीच्या पांडुरंग बरोरा यांच्या पारड्यामध्ये मत टाकून तीन वेगवेगळ्या पक्षांच्या आमदारांना निवडून दिले होते.
२०१४ च्या भिवंडी ग्रामीण लोकसभेच्या निवडणुकीत कपिल पाटील यांनी काँग्रेसचे उमेदवार विश्वनाथ पाटील यांचा १,०९,४५१ लाख मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत काँग्रेसने शिवसेनेच्या एका तुल्यबळ नेत्याला उमेदवारी देणार असल्याची चर्चा मतदार संघात सुरू झाल्याने भाजपासमोर कडवे आव्हान उभे राहण्याची चिन्हे आहेत.
समस्या आणि अपेक्षांचे ओझे
तालुक्यातील सिंचन व्यवस्थेकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने शेतकरी वर्ग नाराज असून कृषी उत्पन्न बाजार समिती निर्माण करण्यात सुद्धा त्यांना अपयश आले आहे. कृषी वर आधारित उद्योगधंद्यांना चालना देण्यात अपयश आले आहे.
वाडा-भिवंडी महामार्गाची दुरावस्था रस्त्यावरील अपघातात शेकडो नागरिकांचे बळी गेले आहेत. तसेच, तालुक्यातील उद्योगधंदे स्थलांतरित व रोजगाराचा प्रश्न गंभीर आहेत.
दृष्टिक्षेपात राजकारण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशभरात पसरलेली लाट आता ओसरली असल्याने भाजपा आणि काँग्रेस यांच्यात कडवी लढत होणार आहे. भाजपाने शिवसेनेसोबत
केलेला संघर्ष आज युती झाली असली तरी त्यांना अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे.
ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना-भाजपमध्ये कडवी झुंज झाली यात शिवसेनेने भाजपाला अस्मान दाखवले होते. भिवंडी महानगरपालिका निवडणुकीत भाजपाला हरवत काँग्रेसने मिळवलेला मोठा विजय भाजपाच्या जिव्हारी लागला होता
वाडा नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेने पालकमंत्र्यांच्या कन्येला पाडून वाड्यावर आपले वर्चस्व सिद्ध केले होते. वाडा पंचायत समितीत भाजपाने राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्तेची फळे चालल्याने शिवसैनिकात चांगलाच रोष आहे.