भाजपपुढे संख्याबळ टिकवण्याचे आव्हान, सर्वच पक्षांच्या उमेदवारांची धाकधूक वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 12:14 AM2020-01-07T00:14:35+5:302020-01-07T00:14:40+5:30
राज्यात सत्तेपासून शिवसेनेने भाजपला दूर ठेवल्याचा फटका जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत बसण्याची शक्यता असून २१ जागा टिकविण्याचे आव्हान भाजपपुढे उभे आहे.
हितेन नाईक
पालघर : राज्यात सत्तेपासून शिवसेनेने भाजपला दूर ठेवल्याचा फटका जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत बसण्याची शक्यता असून २१ जागा टिकविण्याचे आव्हान भाजपपुढे उभे आहे. तर, दुसरीकडे सेनेच्या उमेदवारी देण्यावरून अंतर्गत निर्माण झालेली नाराजी दूर करण्यात सेनेला किती यश मिळते यावर संख्यावाढीचे गणित अवलंबून राहणार आहे.
पालघर जिल्हा परिषदेत एकूण ५७ सदस्यांपैकी भाजपकडे २१ सदस्य, शिवसेना १५+१ ( सेना बंडखोर अपक्ष) १६ ,बविआ १०, माकप ५, राष्ट्रवादी ४ काँग्रेस १ असे बलाबल होते. भाजपच्या २१ सदस्यांपैकी बोईसर ३, वाडा २, डहाणू ५, मोखाडा १, विक्रमगड ४, जव्हार ३, तलासरी ३ असे सदस्य निवडून आले होते. शिवसेनेच्या १६ सदस्यांपैकी पालघर ८, वसई १, वाडा ४, विक्रमगड १, जव्हार १, मोखाडा १ असे सदस्य निवडून आले होते. बविआच्या १० पैकी वसई ३, डहाणू २, पालघर ५ सदस्य निवडून आले होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ५ सदस्यांपैकी डहाणू २, तलासरी २ व जव्हार १, राष्ट्रवादीच्या ४ जागांपैकी डहाणू २, पालघर १, मोखाडा १ तर काँग्रेसचे डहाणूमधून १ असे ५७ सदस्य निवडून आले होते.
राज्यात स्थापन झालेली भाजपची सत्ता अल्पकाळाची ठरल्याने तर दुसरीकडे जिल्ह्यात एकही खासदार, आमदार नसल्याने भाजप ची पुरती कोंडी झाल्याने २०१५ च्या जिल्हा परिषदेमध्ये मिळालेले २१ सदस्यांचे संख्याबळ टिकविण्याचे आव्हान भाजप पुढे उभे आहे. पूर्वी विष्णू सवरांच्या रूपाने एक पालकमंत्री, राजेंद्र गावितांच्या रूपाने खासदार तर जिल्हाध्यक्ष तथा आमदार म्हणून पास्कल धनारे अशी ताकद भाजपकडे होती.
आता झालेल्या निवडणुकीत त्यांचा खासदार ही सेनेकडे गेल्याने व एकही आमदार निवडून न आल्याने त्यांची राजकीय ताकद संपलेली आहे. त्यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी व नव्याने भाजपमध्ये असलेल्या जुन्या नवीन पदाधिकारी यांच्यातील वाद नव्याने निर्माण झाल्याने त्याचाही फटका भाजप ला बसू शकतो.
राष्ट्रवादीचे आमदार निवडून आलेल्या मोखाडा, जव्हार, विक्रमगड व वाडा या गटात एकूण १८ सदस्य आहेत. वाड्यात भाजप २ व सेनेचे ४ सदस्य निवडून आले असून तेथे भाजपला आपल्या जागा टिकवून ठेवणे कठीण जाणार आहे. त्यामुळे सेना, राष्ट्रवादी व माकपच्या उमेदवारांना येथे मदत होऊ शकते.
पालघरमध्ये सर्वाधिक १७ जागा असून शिवसेनेला आपल्या ८ जागा टिकवून ठेवण्याचे दिव्य पेलावे लागणार आहे. मात्र निष्ठावंताना डावलून बाहेरून आलेल्यांना तिकीट दिल्याने नाराजी आहे. भाजपपुढेही आपल्या ३ जागा टिकवून ठेवण्याचे आव्हान असून भाजपने सेनेचे उमेदवार पाडण्याची विधानसभेत खेळलेली खेळी या निवडणुकीत दोघांना मारक तर ठरणार नाही ना?अशी शक्यताही वर्तवली जात आहे.
> प्रतिष्ठेच्या लढती
जिप-तारापूर-प्रकाश निकम
(माजी जिप सदस्य व गटनेता)
जिप- सफाळे-माजी
राज्यमंत्री मनीषा निमकर
जिप-जव्हार-माजी अध्यक्ष सुरेखा थेतले
डहाणू-अमिता घोडा (माजी आमदार अमित घोडा ची पत्नी)
नंडोरे-देवखोप-नीता पाटील-माजी जिप सदस्य
सरावली पस-मेघन पाटील (माजी उपसभापती)
सुरेश तरे-माजी
सभापती जिल्हापरिषद
सलोनी वडे (जिप माजी सभापती अशोक वडे यांची मुलगी)
>उमेदवारांना चिंता मतविभागणीची
विक्र मगड : मतदारसंघ पुनर्रचनेनंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या विक्रमगड मतदारसंघातील ५ गट व १० गणांतील प्रभागामध्ये बदलेल्या राजकीय समीकरणामुळे विक्र मगड पंचायत समिती गड कोण काबीज करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ८६ हजार १०३ मतदार हक्क बजावणार आहेत. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या पंचायत समिती मतदारसंघ काबीज करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षासह अपक्षही मोठ्या ताकदीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे नव्याने निर्माण झालेल्या या प्रभागातील मतदारसंघात शहरी व ग्रामीण अशी मतविभागणी होण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रामुख्याने भाजप, बहुजन विकास आघाडी, शिवसेना, माकप आणि कॉग्रेस-राष्ट्रवादी व विकास आघाडी एकत्र यांच्यामध्ये खरी लढत अपेक्षित आहे. त्यामुळे पंचायत समितीचा गड कोण काबीज करण्यात यशस्वी ठरणार हे लवकरच स्पष्ट होईल. पंचायत समिती व जिल्हा परिषदेवर भाजपची एक हाती सत्ता होती. मात्र या निवडणुकीमध्ये भाजपविरोधात इतर सर्व पक्ष समोर ठाकले आहे. सद्यस्थितीत जिल्हा परिषद गटासाठी ३२ तर पंचायत समिती गणासाठी ५४ असे एकूण ८६ उमेदवार रिंगणात आहेत.