बदलत्या वातावरणाचा मच्छीमारांना मोठा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 12:50 AM2020-08-10T00:50:21+5:302020-08-10T00:50:29+5:30

समुद्रात वादळीवारे; पावसाळी बंदी कालावधी वाढवण्याची मागणी

The changing climate is a big blow to fishermen | बदलत्या वातावरणाचा मच्छीमारांना मोठा फटका

बदलत्या वातावरणाचा मच्छीमारांना मोठा फटका

Next

- हितेन नाईक

पालघर : मासेमारीच्या सुरुवातीलाच समुद्रात निर्माण झालेल्या वादळी वाऱ्यामुळे भरसमुद्रातून मच्छीमारांना माघारी परतावे लागले आहे. दुसरीकडे नौका खडकावर आढळून फुटण्याचे, मच्छीमार समुद्रात बुडून मृत्युमुखी पडण्याचे प्रकारही घडल्याने या बदलत्या व धोकादायक वातावरणात मच्छीमारांना समुद्रात लोटण्याऐवजी सुधारित आदेश काढून पावसाळी बंदी कालावधी वाढवूूून १५ मे ते १५ आॅगस्ट किंवा नारळी पौर्णिमा असा करण्याची मागणी केली जात आहे.

जून महिन्यापासून सुरू होणाºया पावसामुळे समुद्रातील वातावरण धोकादायक बनल्याने व माश्यांच्या पिल्लांच्या वाढीला पुरेसा अवधी मिळावा यासाठी सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ अन्वये समुद्रात पावसाळी मासेमारी बंदी कालावधी घोषित केला जातो. पूर्वी १ जून ते १५ आॅगस्ट किंवा नारळी पौर्णिमा असा बंदी कालावधी जाहीर केला जात असे. मात्र भांडवलशाही मच्छीमारांच्या दबावाखाली येत मत्स्यव्यवसाय विभागातील आणि मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांनी संबंधित मंत्र्यांना चुकीची माहिती पुरवीत पावसाळी बंदी कालावधी घटवल्याचा आरोप मच्छीमार संघटनांकडून केला जात आहे. त्यामुळे हा बंदी कालावधी कमी करून तो सध्या १ जून ते ३१ जुलै असा कमी करण्यात आला आहे. मागील ३-४ वर्षांपासून पावसाळ्याचा कालावधी वाढला असून आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यातही अवकाळी पाऊस कोसळू लागल्याने मासेमारी करण्याचा कालावधी घटत चालला आहे.
जून ते आॅगस्ट या तीन महिन्यात समुद्रातील वादळी वारे आणि तुफानी लाटा असे धोकादायक बनलेले वातावरण त्यानंतर शांत होणे अपेक्षित असले तरी पावसाला उशिराने सुरुवात होऊन अगदी डिसेंबर महिन्यापर्यंत पाऊस कोसळत असल्याने या बदलत्या वातावरणाचा मोठा परिणाम मच्छीमारी व्यवसायावर होऊ लागला आहे. मे महिन्यात निसर्ग वादळाने कोकण किनारपट्टीवर धडका दिल्याने मच्छीमारांना मागे परतावे लागले होते.

समुद्रातील मत्स्यसाठे टिकवण्यासाठी शासनाने निर्णय घ्यावा
समुद्रातील वातावरण ढवळून निघाले असल्याचे मत जुने जाणते क्रियाशील मच्छीमार सुभाष तामोरे व्यक्त करीत असून समुद्रातील मत्स्यसाठे टिकवून ठेवण्यासाठी पावसाळी बंदी कालावधीमध्ये शासनाने वाढ करावी, असे सांगत आहेत.
बंदी कालावधीत मच्छीमार आणि त्या व्यवसायावर अवलंबून असणाºया मत्स्य विक्रेत्यांना शासनाने एक पॅकेज दिल्यास मत्स्य उत्पादन वाढीला उत्तेजन मिळू शकणार आहे.
मच्छीमारीसाठी येणाºया ३ ते ४ हजार आदिवासी खलाशांना आपल्या शेतीची कामे करण्याचा पुरेसा कालावधीही मिळणार असून मत्स्य उत्पादन वाढून मत्स्य दुष्काळ जाहीर करण्याची मच्छीमारांची अनेक वर्षांपासूनची ओरड आपोआप मागे पडणार आहे.

१ आॅगस्टपासून मासेमारीला सुरुवात झाल्यानंतर २ आॅगस्ट रोजी समुद्रात मासेमारीला गेल्यानंतर निर्माण झालेल्या वादळाच्या तडाख्याने गोराई (बोरिवली), उत्तन, चौक, सातपाटी येथील तीन बोटी समुद्रात बुडाल्या होत्या. या घटनेत अनेक मच्छीमारांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता, तर तीन मच्छीमारांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला होता.

Web Title: The changing climate is a big blow to fishermen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.