विरार पोलिसांनी साजरा केला आगळावेगळा स्वातंत्र्यदिन ; गहाळ झालेले लाखो रुपयांचे १९ मोबाईल केले परत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 02:02 PM2023-08-15T14:02:09+5:302023-08-15T14:02:59+5:30
७६ व्या स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून विरार पोलिसांनी मंगळवारी आगळावेगळा स्वातंत्रदिन साजरा केला आहे.
नालासोपारा (मंगेश कराळे) - ७६ व्या स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून विरार पोलिसांनी मंगळवारी आगळावेगळा स्वातंत्रदिन साजरा केला आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत गहाळ झालेले मोबाईल फोनचा तपास करुन १ लाख ८४ हजार रुपये किंमतीचे १९ मोबाईल फोन नागरिकांना परत केले आहे. त्यावेळी हजर असलेल्या नागरिकांच्या तोंडावर हास्य उमटले होते.
विरार परिसरात चालु वर्षात नागरिकांचे मोबाईल फोन गहाळ होण्याचे प्रमाण वाढले होते. वरिष्ठांनी प्रॉपर्टी मिसींग मधील मोबाईल फोनचा शोध तपास करण्यासाठी दिलेल्या आदेशानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकाने प्रॉपर्टी मिसींगचा तपास हाती घेतला होता. गहाळ झालेल्या मोबाईल फोनच्या तांत्रिक विश्लेषण करुन भारत देशातील वेगवेगळया राज्यांमधुन तसेच महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळया जिल्ह्यामधून गहाळ झालेले १ लाख ८४ हजार रुपये किंमतीचे वेगवेगळया कंपनीचे १९ मोबाईल फोनचा शोध लाऊन ते प्राप्त करण्यास यश प्राप्त केले. पोलिसांनी हद्दीत गहाळ झालेले मोबाईलचा तपास करून हस्तगत झालेले १९ मोबाईल फोन १५ ऑगस्टला नागरिकांना देण्याचा कार्यक्रम मंगळवारी सकाळी पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवला होता.
सदरची कामगिरी परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त सुहास बावचे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विरारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिलीप राख, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश फडतरे, पोलीस हवालदार सचिन लोखंडे, संदिप जाधव, इंद्रनिल पाटील, संदिप शेरमाळे, विशाल लोहार, योगेश नागरे, मोहसीन दिवाण, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, रोशन पुरकर, दत्तात्रय जाधव, प्रफुल सोनार यांनी केलेली आहे.