वसई परिवहनचा संप बेकायदा, आमदार हितेंद्र ठाकूरांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 03:35 AM2017-08-23T03:35:13+5:302017-08-23T03:35:21+5:30
या महापालिकेच्या परिवहन कामगारांनी सुरु केलेला संप बेकायदेशीर असून प्रवाशांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केला. संपावर कोणताच तोडगा निघत नसल्याने कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरुच ठेवले आहे.
वसई : या महापालिकेच्या परिवहन कामगारांनी सुरु केलेला संप बेकायदेशीर असून प्रवाशांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केला. संपावर कोणताच तोडगा निघत नसल्याने कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरुच ठेवले आहे. त्यामुळे जनतेचे हाल सुरुच आहेत.
दहा बडतर्फ कामगारांना तात्काळ कामावर घ्या, यामागणीसाठी विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली श्रमजीवी कामगार संघटनेने बेमुदत काम बंद सुरु ठेवले आहे. यावर आयुक्त तोडगा काढायला तयार नाही. तर ठेकेदार मनोहर सकपाळ यांनी ठेका सोडत असल्याचे पत्र महापालिकेला देऊन तडजोड करणार नाही, असेच दाखवून दिले आहे. गेल्या नऊ दिवसात सत्ताधारी बहुजन विकास आघाडीने संपावर कोणतेही भाष्य केले नाही. पण, मंगळवारी आमदार हिेतेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितिज ठाकूर यांनी अचानक पत्रकार परिषद बोलावली. त्यामुळे आमदारद्वयी संपाबाबत ठोस घोषणा करतील अशी पत्रकारांची अपेक्षा होती. पण, आमदार ठाकूरांनी संप बेकायदा असल्याचा आरोप करून संपकरी श्रमजीवी संघटनेला दोष दिला. संपात ज्यांचा संबंध नाही अशा आदिवासी महिलांना बाहेरून आणले गेले आहे. त्या महिला अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्याचा धाक दाखवून संप बळजबरीने रेटून नेत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
बडतर्फी मागे घेण्याचा निर्णय झाला असतांना विश्वाघात केल्याने संप पुन्हा सुरु झाला. आजपर्यंत एकाही पदाधिकाºयाने तोडगा काढण्याचा प्रयत्न केलेला नाही. कामगाराच्या व्यथा आणि नागरीकांची सोय समजून घ्या. तोडगा काढण्यात पुढाकार घ्या. सहकार्याचा हात मी जाहिरपणे पुढे करीत आहे, असे प्रति आवाहन संघटनेचे नेते विवेक पंडित यांनी आमदार ठाकूरांना केले आहे.
10 कामगारांना बडतर्फ करण्यात आले असले तरी त्यांना पुन्हा कामावर घेतले जाणार आहे. पण, त्यासाठी कायदेशीर चौकशी पूर्ण होणे गरजेचे आहे. पण, दिशाभूल करून संप चिघळवण्यात येत असल्याचा आरोपही आमदार ठाकूर यांनी केला आहे. तर संपकºयांनी लोकांच्या हितासाठी संप मागे घेऊन काम सुरु करावे, असे आवाहनही आमदार ठाकूर यांनी यावेळी केले.