व्हॉट्सॲपवर मॅसेज पाठवत ऑनलाइन पेमेंट करण्यास सांगून केली पोलिसांचीच फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 08:44 AM2023-08-09T08:44:56+5:302023-08-09T08:45:40+5:30
दोघांना पोलिसांनी राजस्थानमधून केली अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा : हॉटेल शोधण्यासाठी गूगलवर शोध घेताना ऑनलाइन पेमेंट करण्यास सांगून पोलिसांचीच फसवणूक करण्यात आली. फसवणूक करणाऱ्या या दोन आरोपींना राजस्थानमधून मांडवी पोलिसांनी अटक केली.
मांडवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत जवळपास हॉटेलबाबत गूगल सर्चवर शोध घेतला असता, व्हॉट्सॲपवर मोबाइल क्रमांक उपलब्ध झाला. त्या नंबरवर व्हॉट्सॲपवर मॅसेज पाठवला. त्या नंबरवरून व्हॉट्सॲप कॉल करून हॉटेल बुकिंगकरिता दुसऱ्या एका मोबाईल नंबरवर ऑनलाइन पेमेंट पाठविण्यास सांगितले. फिर्यादींनी ऑनलाइन पेमेंट पाठविल्यानंतर त्यांना व्हॉट्सॲपवर लिंक आली. त्या लिंकवर फिर्यादीने व्हॉट्सॲप कॉन्फरन्स कॉल करून आरोपीने ऑनलाइन पेमेंट पोर्टलच्या माध्यमातून एकूण ८ ट्रान्झॅक्शनद्वारे ८८ हजार रुपये राजस्थानातील आरोपीने खात्यावर जमा करून आर्थिक फसवणूक केली होती. मांडवी पोलिसांनी २२ मे रोजी गुन्हा दाखल केला होता, अशी माहिती माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी मंगळवारी दिली.
या गुन्ह्याच्या तपासात तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी लक्ष्मणराज संजयसिंह झाला (वय २२) आणि सुभाष प्रभुलाल मकवाना (वय २१) यांचा सहभाग निष्पन्न होत असल्याने राजस्थानच्या बांसवाडा येथे पोलिस पथक पाठवून ताब्यात घेतले. त्यांना ५ ऑगस्टला अटक करण्यात आली. या गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपींनी गुन्ह्याशिवाय इतर अनेक लोकांची फसवणूक केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
पोलिसांचे आवाहन
आरोपीने अशा प्रकारे मोबाइल नंबर आणि बँक खाते वापरून फसवणूक केली असेल, तर मांडवी पोलिस ठाण्याशी संपर्क करावा, असे आवाहन केले आहे. गुन्ह्यात अटक आरोपीची १० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी ठोठवण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रफुल्ल वाघ करीत आहेत.