कार मनी कंपनीकडून अनेकांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 03:41 AM2018-06-13T03:41:29+5:302018-06-13T03:41:29+5:30
वसई विरारमध्ये जशी लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे तसेच लोकांचे पैसे झटपट कमवायचे वेडही वाढते आहे. त्यासाठी अनेक महाभाग कोणत्याही मार्गांचा अवलंब करतांना आपल्याला दिसून येतात.
वसई - वसई विरारमध्ये जशी लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे तसेच लोकांचे पैसे झटपट कमवायचे वेडही वाढते आहे. त्यासाठी अनेक महाभाग कोणत्याही मार्गांचा अवलंब करतांना आपल्याला दिसून येतात. त्यातलाच एक मार्ग म्हणजे, गाडी कंपनीला लावून पैसे कमवायचे. पैसे कमवण्याची जणू हि नवी संकल्पनाच उदयास आली आहे. नालासोपाऱ्यात अशाच एका कार मनी नावाच्या कंपनीकडून अनेक ग्राहकांची फसवणूक होऊन कोट्यावधीचा घोटाळा समोर आला आहे.
आनंद विश्वकर्मा या तरुणाने आपली वॅगनआर कार १ एप्रिल २०१८ रोजी कार मनी या कंपनीचे प्रोपरायटर निलेश तोंडकर यांना १७ हजार रुपये दर महा भाड्याने दिली होती आणि निलेश यांनी १७ हजारांचा चेक देखील आनंद यांना दिला होता. मात्र चेक बाउंस झाला त्यामुळे आनंदने निलेश यांच्याशी संपर्क साधला व विचारणा केली असता, निलेश ने उडवाउडवीची उत्तरे दिली व पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे आनंदने कंपनीच्या कार्यालयाशी संपर्क साधला, तेव्हा त्याचसारखेच अजून ३०-३५ जण त्या कार्यालयाबाहेर असल्याचे आनंदच्या लक्षात आले.
तेव्हा हा सर्व फसवणूकिचा प्रकार आनंदच्या लक्षात आला व त्याने लगेच पोलीस ठाणे गाठून हा घोटाळा उघडकीस आणला.
कंपनीने गुंडाळला गाशा
दरमहा पंधरा ते वीस हजार रु पये देण्याचे आमिष दाखवून नालासोपार्यातील कार मनी कंपनीने अनेक चार चाकी गाड्या भाड्याने घेतल्या होत्या. कार मालकांना कंपनीने भाडे तर वेळेवर दिले नाहीच शिवाय त्यांच्या गाड्या देखील गायब केल्याचे समोर आले आहे. आता तर या कंपनीने आपला गाशा गुंडाळल्याने कार मालक देखील हवालदिल झाले आहेत.