शाम्पू बनवणाऱ्या केमिकलचा टँकर उलटला, शेतकऱ्यांत भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 01:25 AM2019-11-11T01:25:19+5:302019-11-11T01:25:27+5:30
शॅम्पू तयार करणा-या रसायनाचा टँकर मुंबईकडून गुजरातकडे जात होता.
कासा : शॅम्पू तयार करणा-या रसायनाचा टँकर मुंबईकडून गुजरातकडे जात होता. मेंढवण गावठणपाडा येथे मोटारसायकलस्वारास वाचवण्याच्या प्रयत्नात शनिवारी रात्री हा टँकर उलटला. त्यातील रसायन कौटुंबी नदी पात्रात पसरून रविवारी सकाळी हजारो मृत माशांचा खच पडला.
या मृत माशांमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. कासा पोलिसात चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेंढवणहून जाणारी कौटुंबी नदी तवापर्यंत वाहते. तिच्या तीरावर अनेक गावे वसली असून शेतीसाठीही या पाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे नदीत रसायन मिसळल्याने भीती व्यक्त होत आहे.
>टँकरमध्ये असलेले विषारी केमिकल पाण्यात मिसळल्याने मासे मृत्यूमुखी पडले. त्यामुळे नदी पात्र विषारी बनले असून, शेतीचेही नुकसान झाले आहे
-बिस्तुर कुवरा, सरपंच, मेंढवण