चिकू बागायतदारांना पीकविम्याची प्रतिक्षा; कंपनी व बँकेची हलगर्जी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 11:14 PM2019-05-31T23:14:59+5:302019-05-31T23:15:12+5:30
खरीप हंगामात आद्रतेचे प्रमाण जास्त प्रमाणात राहिल्याने बागायतदारांना विम्याची रक्कम देणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार अनेक बागायतदारांना पीक विम्याचा लाभ मिळाला.
शौकत शेख
डहाणू : विमा कंपनी आणि राष्ट्रीयीकृत बँकांचा हलगर्जीपणामुळे डहाणू तालुक्यातील जवळपास ४० चिकू बागायतदारांना पीक विमा योजनेपासून वंचित राहावे लागत असल्याने बागायतदार चिंतेत आहेत. बँकेकडून पोर्टलमध्ये शेतकऱ्यांची माहिती न भरण्यात आल्याने शेतकऱ्यांना त्याचा फटका बसल्याची प्रतिक्रिया बागायतदार शेतकºयांंकडून व्यक्त करण्यात येत आहे.
चिकू पिकाला पंतप्रधान पीक विमा योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीत कमाल दहा दिवस ९० टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्राता राहिल्यास शंभर टक्के व किमान पाच दिवस राहिल्यास ५० टक्के नुकसानभरपाई विमा कंपनीने द्यावी, अशा अटीवर २०१८ मधील खरीप हंगामात टाटा एआयजी या विमा कंपनीकडे पीक विम्याची जबाबदारी देण्यात आली होती. ३० जूनपूर्वी बागायतदारांनी पाच टक्के रक्कम जमा करून विम्याचे अर्ज दाखल करावेत, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. त्यानंतर डहाणू तालुक्यातील ३२ बागायतदारांनी बँक आॅफ महाराष्ट्रच्या डहाणू शाखेत प्रस्ताव सादर केले होते. त्यानुसार बागायतदारांच्या खात्यातून २,६४,९९४ रुपयांची रक्कम विमा हप्ता म्हणून वसूल करण्यात आली. खरीप हंगामात आद्रतेचे प्रमाण जास्त प्रमाणात राहिल्याने बागायतदारांना विम्याची रक्कम देणे क्रमप्राप्त आहे. त्यानुसार अनेक बागायतदारांना पीक विम्याचा लाभ मिळाला.
मात्र, डहाणू येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या हलगर्जीपणामुळे २२ बागायतदार विम्याच्या लाभापासून वंचित आहेत. आपल्या हक्काचे पैसे मिळावेत म्हणून संबंधित बागायतदारांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा डहाणू, टाटा विमा कंपनी आणि कृषी विभागप्रमुख यांच्याशी पत्रव्यवहार केला. मात्र, समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याची बागायतदारांची तक्र ार आहे.