वर्सोवा खाडीपाशी घडलेल्या दुर्घटनास्थळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 03:48 PM2024-06-14T15:48:56+5:302024-06-14T15:49:29+5:30
वर्सोवा खाडीनजीक एमएमआरडीएच्या माध्यमातून एल अँड टी कंपनीकडून सुरू असलेल्या बोगद्याच्या कामावेळी जमीन खचून संरक्षण भिंत कोसळल्याने जेसीबी ऑपरेटर राकेश यादव जेसीबीसकट गाडला गेला होता.
नालासोपारा (मंगेश कराळे) :- ससूनवघर गावाजवळील एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामासाठी खणलेल्या बोगद्यात घडलेल्या दुर्घटनेची शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच यावेळी घडलेल्या दुर्घटनेची महिती घेऊन दुर्घटनाग्रस्त कामगाराचा शोध घेण्यासाठी सैन्यदल, कोस्टगार्ड, एनडीआरएफ, एसडीआरएफच्या मदतीने संयुक्त बचावकार्य सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
वर्सोवा खाडीनजीक एमएमआरडीएच्या माध्यमातून एल अँड टी कंपनीकडून सुरू असलेल्या बोगद्याच्या कामावेळी जमीन खचून संरक्षण भिंत कोसळल्याने जेसीबी ऑपरेटर राकेश यादव जेसीबीसकट गाडला गेला होता. यावेळी त्याला बाहेर काढण्यासाठी गेल्या १७ दिवसापासून बचावकार्य हाती घेऊनही अपेक्षित यश मिळाले नव्हते. अखेर शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन त्याला बाहेर काढण्यासाठी मदतकार्याला वेग दिला असून सैन्यदल, कोस्टगार्ड यांच्या मदतीने हे बचावकार्य सूरु करण्यात आले आहे. यात या दुर्घटनाग्रस्त व्यक्तीला बाहेर काढण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सैन्यदल आणि कोस्ट गार्ड यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन या कामगाराला लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी शक्य ते सारे प्रयत्न करण्यात येतील असे त्यांनी सांगितले. दरम्यान या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले असून त्यात जो दोषी ठरेल त्याच्यावर नक्की कारवाई करण्यात यईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी राकेश यादव याच्या कुटूंबियांची स्वतः भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच घडलेली दुर्घटना दुर्दैवी असून सरकार आपल्या सोबत असल्याचे सांगून त्यांना आशवस्त केले. त्यांना ५० लाखांची मदत देण्यात येईल तसेच त्यांच्या कुटूंबातील एका सदस्याला एलअँडटी कंपनीत नोकरीही देण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या मुलांना देखील लागेल ते सहकार्य कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले. तसेच सध्या मुंबईत त्यांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांना दिले आहेत. तसेच अडकलेल्या कामगाराला शोध घेण्याला वेग दिला असून त्यात नक्की यश मिळेल असेही त्यांनी यादव कुटूंबियांना सांगून त्यांना धीर दिला.
यावेळी एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम,पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके,वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवार तसेच एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी, भारतीय नौदल, सैन्यदल, एनडीआरएफ, एसडीआरएफ यांचे अधिकारी आपल्या तुकडीसह उपस्थित होते.