मुख्यमंत्री आज प्रचारासाठी विरारला ?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 12:21 AM2019-04-22T00:21:58+5:302019-04-22T00:22:29+5:30
योगींची सभा दोनदा पुढे ढकळली; मुख्यमंत्र्यांचा दौराही घोषित नाही
नालासोपारा : युतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा विरारमध्ये येणार असून जाहीर सभा विरार पूर्वेकडील मनवेल पाडा तलावाजवळ सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास होणार आहे. तसेच मुख्यमंत्री बविआच्या आणि हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात काय बोलतील याकडे वसई तालुक्यातील नागरिकांसह युतीच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
नालासोपारा शहरात १९ एप्रिलला यूपीचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी सभा घेणार असल्याची चर्चा होती पण तारीख पुढे ढकलून ते आता २२ एप्रिलला जाहीर सभा घेणार असे सांगण्यात आले पण ती ही रद्द होऊन ते आता २४ एप्रिलला सभा घेणार असल्याचे युतीकडून सांगण्यात आले आहे पण ते या सभेला येणार की नाही अशी चर्चा युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. तर पालघरमधील विजयाबद्दल साशंकता असल्याने योगी सभा घेणार नसल्याची चर्चा युतीत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांचा पालघर दौरा किंवा जाहीर सभा घेण्याचा कोणताही कार्यक्र म रविवार रात्रीपर्यंत जाहीर नव्हता पण पालघर मध्ये युतीची पोजीशन काहिशी कमकुवत असल्याने येथे सभा घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी आणि युतीने ऐनवेळी घेतला असेही युतीमध्ये बोलले जात आहे.
सीएम दौऱ्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेच्या ठिकाणी सोमवारी सकाळी बॉम्बशोध पथक आणि डॉग स्कॉडकरून स्टेज आणि आजूबाजूच्या परिसरात पाहणी केली जाणार आहे. यानंतर पालघर पोलिसांकडून १ अप्पर पोलीस अधीक्षक, ३ पोलीस उपअधीक्षक, ८ पोलीस निरीक्षक, २० सहायक पोलिस निरीक्षक, ४० पोलीस उपनिरीक्षक, २०० पोलीस कर्मचारी, आर सीपी च्या दोन टीम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या १५ जणांची टीम असा तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
पालघर लोकसभेची सीट पडणार असल्याच्या भीतीमुळे मुख्यमंत्री जाहीर सभा घेणार आहे. आता गुजरातचे मुख्यमंत्री, सेनेचे एकनाथ शिंदे, राजनाथ सिंग, योगी, असे अनेक नेते सभा घेतील पण याचा काहीही उपयोग होणार नसून ही निवडणूक रिक्षा जिंकणारच.
- हितेंद्र ठाकूर, अध्यक्ष, बहुजन विकास आघाडी