चिखले विजयवाडीत गुंडांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 03:18 AM2018-08-13T03:18:11+5:302018-08-13T03:18:21+5:30
चिखले गावातील अनुसूचित जातीच्या विजयवाडी वस्तीत शनिवारी मध्यरात्री काही समाजकंटकांनी धुमाकूळ घातला. त्यांनी चप्पल गोळा करून विहिरीत आणि दगडगोटे सार्वजनिक शौचालयात टाकले. एका महीलेच्या घराच्या खिडकीचे नुकसान करून तिला बाहेर येण्यास भाग पाडले.
बोर्डी - चिखले गावातील अनुसूचित जातीच्या विजयवाडी वस्तीत शनिवारी मध्यरात्री काही समाजकंटकांनी धुमाकूळ घातला. त्यांनी चप्पल गोळा करून विहिरीत आणि दगडगोटे सार्वजनिक शौचालयात टाकले. एका महीलेच्या घराच्या खिडकीचे नुकसान करून तिला बाहेर येण्यास भाग पाडले. तिने प्रतिसाद न दिल्याने तिच्या घरावर दगडफेक करण्यात आली. ते चार-पाच तास भयानक असल्याची प्रतिक्रिया वस्तीतील नागरिकांनी दिली. दरम्यान रविवारी घोलवड पोलसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थितीचा आढावा घेतला.
शनिवारीवारच्या मध्यरात्री चिखले गावात वीज खंडित झाली होती. या दरम्यान काही समाजकंटकांनी विजयवाडी वस्तीतील चार-पाच घरांच्या ओट्यावर ठेवलेल्या चप्पला गोळा करून, त्या लगतच्या सार्वजनिक विहिरीत फेकल्या आणि विहिरीनजीक मानवी मैलाही टाकण्यात आला. त्यानंतर काही घराच्या ओट्यावर वाळत घातलेले शाळा- महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे गणवेश, महिलांचे कपडे एकत्रित करून एका घराच्या छतावरील पाण्याच्या टाकीत कोंबले. एवढ्यावरच न थांबता सार्वजनिक शौचालयात केरकचरा, दगडगोटे टाकण्यात आले. एका महिलेच्या घराची खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र तो अपयशी ठरला. नंतर त्यांनी पंचवीस वर्षीय महिलेच्या घराला टार्गेट केले. तिचा पती परगावी असून ती दोन मुलांसह राहते. तिच्या घराच्या खिडकीची लोखंडी जाळी तोडून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला गेला. शिवाय तिला घराबाहेर येण्यास सांगण्यात आले. तिच्या घराच्या छपरावरील कौले काढून प्रवेश करण्याचा प्रयत्न झाला. नंतर त्यांनी घरावर दगडफेकही केली.