अखेर जिल्ह्यातील चिकूला मिळाली दिल्लीत बाजारपेठ; डहाणू-दिल्ली रेल्वेला हिरवा झेंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 01:04 AM2021-01-29T01:04:00+5:302021-01-29T01:04:16+5:30
डहाणूहून रेल्वेगाडी दिल्लीकडे झाली रवाना
बोर्डी : पालघर जिल्ह्यातील डहाणू रोड रेल्वे स्थानकातून बुधवार, २७ जानेवारीच्या मध्यरात्री दोन वाजता कृषी मालाची निर्यात करणारी पहिली रेल्वेदिल्लीकडे रवाना झाली. या गाडीच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील शेतमाल उत्तर भारतातील बाजारपेठेत निर्यात करणे सोपे झाल्याची माहिती रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी ट्वीट करून दिली आहे.
पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून शेतमाल निर्यातीसाठी रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला होता. बुधवार, २७ जानेवारी मध्यरात्री दोन वाजता या रेल्वे गाडीच्या पहिल्या प्रवासाला प्रारंभ झाला. याकरिता डहाणूच्या सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, तहसीलदार राहुल सारंग, नगराध्यक्ष भरत राजपूत, तालुका कृषी अधिकारी संतोष पवार, महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघाचे खजिनदार कृषिभूषण यज्ञेश सावे, मिलिंद बाफना आणि बागायतदार उपस्थित होते.
त्यांनी या रेल्वे गाडीच्या इंजिन आणि निर्यातीसाठी डहाणू घोलवड भौगोलिक मानांकन प्राप्त ६० किलो टन चिकू ठेवलेल्या डब्याला पुष्पहार घालून सजविले होते. चिकू बागायतदार महिला शेतकरी सुनीता बाफना यांनी विधिवत पूजन केले. त्यानंतर सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी हिरवा झेंडा दाखवताच या गाडीने दिल्लीच्या आदर्शनगर स्थानकाकडे प्रवास सुरू केला. यावेळी उपस्थित शेतकरी आणि नागरिकांनी एकच जल्लोष केला. ‘भारत माता की जय, जय जवान, जय किसान’च्या घोषणांनी हे स्थानक दुमदुमून गेले होते. दरम्यान, रेल्वे बोर्डाचे अभय सानप, संदेश चिपळूणकर यांचे विशेष सहाय्य कृषी मालवाहतूक सुरू होण्यासाठी लाभले. आगामी काळात चिकूसह अन्य फळे आणि भाजीपाला निर्यात वाढण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.