गुजरातमधील कारखान्यांत बालकामगार, तलासरीतील मुलींचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 11:54 AM2022-04-18T11:54:16+5:302022-04-18T11:57:43+5:30

तलासरी भागात रोजगाराच्या संधी कमी असून येथे असलेले कारखाने राजकारण्यांच्या साठमारीत बंद पडले आहेत.

Child laborers in the Factories in Gujarat, girls from Talasari | गुजरातमधील कारखान्यांत बालकामगार, तलासरीतील मुलींचा समावेश

गुजरातमधील कारखान्यांत बालकामगार, तलासरीतील मुलींचा समावेश

Next

सुरेश काटे -

तलासरी :
गुजरात राज्यातील उंबरगाव, संजान,  वापी तसेच केंद्रशासित दादरा नगर हवेलीतील कारखान्यांत तलासरी, डहाणू तालुक्यांतील बालकामगार मोठ्या प्रमाणात काम करतात. यामध्ये प्रामुख्याने तरुणींचा समावेश असून त्यांच्या आर्थिक  व शारीरिक शोषणाकडे स्वतःला आदिवासींचे पुढारी म्हणणाऱ्यांचे तसेच शासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे.

तलासरी भागात रोजगाराच्या संधी कमी असून येथे असलेले कारखाने राजकारण्यांच्या साठमारीत बंद पडले आहेत. त्यामुळे येथील कामगार मोठ्या संख्येने गुजरात राज्यात तसेच केंद्रशासित प्रदेशातील कारखान्यात कामाला जातात; पण महाराष्ट्रातून गेलेल्या कामगारांना योग्य त्या सुविधा मिळत नाहीत. कामाचा भरवसा नाहीच; पण आर्थिक आणि शारीरिक शोषणाला त्यांना सामोरे जावे लागते, पण याची दखल  कोणीच घेत नाही.

गुजरात राज्यात  तसेच केंद्रशासित प्रदेशातील कारखान्यात संघटना नाहीत. येथील कारखान्यात ठेकेदाराकडून कामगार लावले जातात; पण या ठेकेदाराकडून कामगारांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. तरुणींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते; पण ठेकेदाराच्या तसेच कारखानदाराच्या विरुद्ध बोलले तसेच मनासारखे वागले नाही तर कामावरून काढून टाकण्याची भीती दाखवली जाते. तेथील शासकीय यंत्रणा कारखाना मालकांची बाजू घेते आणि गुन्हा अत्याचार गुजरात राज्यात घडत असल्याने महाराष्ट्रातील यंत्रणाही काही करू शकत नसल्याचे सांगून हात वर करते. 

कोरोनाच्या काळात येथील शाळा, कॉलेज बंद होते. त्यामुळे येथील अल्पवयीन मुली मोठ्या संख्येने गुजरात राज्यातील कारखान्यात कामाला गेल्या. 

खासगी वाहनात कोंबतात दाटीवाटीने 
गुजरात राज्यात कामाला जाणाऱ्यांसाठी वाहतुकीची साधने नसल्याने खासगी वाहनाने जावे लागते. या खासगी वाहनांत  प्रमाणापेक्षा जास्त कामगार भरले जातात. एकेका वाहनात पंधरा ते वीस कामगार मुली दाटीवाटीने भरल्या जातात. गुजरात राज्यात जाणाऱ्या अल्पवयीन मुलींना कोण न्याय मिळवून देणार? आपल्याकडे अनेक संघटना, महिला आयोग आहेत. महिला कमिट्या आहेत, पण गुजरात राज्यात जाणाऱ्या महिला-मुलींचे आर्थिक व शारीरिक शोषण कोण थांबवणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 

Web Title: Child laborers in the Factories in Gujarat, girls from Talasari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.