डहाणूतील मिरची उत्पादकांचे होतेय कोट्यवधींचे नुकसान, शेतकरी हतबल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 11:38 PM2021-05-04T23:38:19+5:302021-05-04T23:38:32+5:30

बाजारपेठेत शंभर रुपये किलो भावाने विकली जाणारी ढोबळी मिरची दलालांकडून केवळ दहा रुपयाने खरेदी केली जात असल्याने त्या भावात मजुरीदेखील सुटत नाही

Chili growers in Dahanu lose billions, farmers are helpless | डहाणूतील मिरची उत्पादकांचे होतेय कोट्यवधींचे नुकसान, शेतकरी हतबल

डहाणूतील मिरची उत्पादकांचे होतेय कोट्यवधींचे नुकसान, शेतकरी हतबल

Next

शौकत शेख
लोकमत न्यूज नेटवर्क 
डहाणू : डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील चिंचणी, वाणगाव, वाढवण, चंडीगाव, आसनगाव, बावडा, केतखाडी, तनाशी आदी भागात ढोबळी मिरचीचे विक्रमी उत्पादन घेतले जाते. येथील प्रसिद्ध ढोबळी मिरची खासकरून मुंबई, राजस्थान तसेच दिल्ली, जयपूर येथे मोठ्या प्रमाणात रोजच्या रोज पाठविली जात होती. परंतु ऐन हंगामात कोरोनामुळे मुंबई, दिल्ली येथे मुख्य भाजीपाला मार्केट बंद झाल्याने येथील शेतकऱ्यांच्या पायाखालची वाळूच सरकली असून, त्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

बाजारपेठेत शंभर रुपये किलो भावाने विकली जाणारी ढोबळी मिरची दलालांकडून केवळ दहा रुपयाने खरेदी केली जात असल्याने त्या भावात मजुरीदेखील सुटत नाही. यामुळे बागायतदारांनी ढोबळी मिरचीच्या संपूर्ण बागा मोकाट गुरे तसेच बकऱ्यांच्या हवाली केल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येत आहे. मुंबई शहराला भाजीपाला पुरवठा करण्यात सिंहाचा वाटा असलेल्या डहाणूच्या बंदरपट्टी भागातील शेतकरी बागायतदार कर्जबाजारी झाले आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सरकारने गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊन, संचारबंदी, वाहतूकबंदी, रेल्वेबंदी, आयात-निर्यात बंदी, मास्क बांधणे, सुरक्षित अंतर ठेवणे, शाळाबंदी, व्यवसायबंदी अशा विविध उपाययोजना केल्याने त्याचा सर्वाधिक फटका पालघर जिल्ह्यातील ढोबळी मिरची, भाजीपाला, चिकू, नारळ, आंबे, पेरू, लिचीबरोबरच विविध प्रकारची फुले, भात लागवड अशा कृषी उत्पादकांना बसला आहे. त्याबरोबरच शेती-बागायतीमध्ये काम करणाऱ्या मजुरांवरदेखील उपासमारीची वेळ आलेली आहे.

येथील पश्‍चिम किनारपट्टीवर डहाणू, चिंचणी, वाणगाव भागात प्रामुख्याने रब्बी हंगामात नवनवीन तंत्रज्ञानाच्या वापराबरोबरच नेट 
शेड, पॉलिहाऊसचा वापर करून व महागडी संकरित मिरची व ढोबळी मिरचीच्या बियाणांचा वापर करून भरघोस उत्पादन घेतले जाते. ते 
मुंबई, दिल्ली, कोलकाता तसेच परदेशातही पाठविण्यात येते; 
मात्र गेल्या वर्षापासूनच्या दोन हंगामात कोरोना टाळेबंदी, वाहतूकबंदी, संचारबंदीमुळे कृषी उत्पादन होऊनही त्याला गिऱ्हाईक नसल्याने मागणीच  नाही.

व्यापाऱ्यांकडून फसवणूक
nऐन हंगामात कोरोनामुळे मुंबई, दिल्ली येथे भाजीपाला मार्केट बंद झाल्याने येथील शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. उत्पादन खर्चापेक्षा अगदी अल्प किमतीने बागायतदारांना मालाची विक्री करावी लागते. आता तर दिल्लीसारख्या ठिकाणी मिरची जाणे बंद झाल्याने दहा-बारा रुपये किलोप्रमाणे मिरची, ढोबळी मिरची शेतकऱ्यांना विकावी लागत आहे. 
nयामुळे शेतकऱ्यांचा झालेला खर्चही सुटत नाही. काही बागायतदारांनी तर मिरची बागेत गुरे, बकरी घालायला सुरुवात केली आहे. थोडीफार मिरची व्यापारी नेतात, मात्र ते अल्प भाव देऊन बागायतदारांची फसवणूक करीत आहेत.

Web Title: Chili growers in Dahanu lose billions, farmers are helpless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.