वसईचा चिमाजी अप्पा किल्ला २१ हजार दिव्यांनी उजळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 01:32 AM2019-10-22T01:32:55+5:302019-10-22T01:33:28+5:30
वसईतील ‘आमची वसई ’ या सामाजिक संस्थेतर्फे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
वसई/नालासोपारा : वसईतील ‘आमची वसई ’ या सामाजिक संस्थेतर्फे दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या दीपपूजना दिवशी तब्बल २१ हजार पणत्या वसईच्या किल्ल्यात लावण्यात येणार असून तालुक्यातील प्रत्येक गावाला ५०१ दिवे आणण्याचे आवाहन या संस्थेने केले आहे.
पोर्तुगिजांच्या जाचातून वसईकरांना मुक्त करण्यासाठी २१ हजार मावळे हुतात्मा झाले. दिवाळीत संपूर्ण वसई - विरार शहर, घरे, दुकाने, मंदिर, चर्च, मॉल, रस्ते प्रकाशमान होऊन झगमगत असतात. तर दुसरीकडे पराक्रमी मराठा सैन्याच्या शौर्याचा तसेच बलिदानाचा साक्षीदार असलेला हा वसईचा चिमाजी अप्पा किल्ला चोहोबाजूंनी अंधारात असतो. मराठा सैन्य तसेच भारतीय जवानांमुळेच आपण सर्वत्र दिवाळी आनंदात साजरी करीत असताना त्या पराक्र मी सैन्यास मानवंदना अर्पण करण्यासाठी ‘टीम आमची वसई’तर्फे वसई किल्ल्यात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार, २६ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता नरवीर चिमाजी आप्पा स्मारक, वसई किल्ला येथे वसई दुर्ग दीपोत्सव साजरा होणार आहे. या दीपोत्सवात पणत्या प्रज्वलित करून आणि रंगीबेरंगी रांगोळ्या काढून, आकाशकंदील लावून नरवीर चिमाजी आप्पा स्मारक उजळवण्यात येणार आहे.
संस्थेने केले आवाहन प्रवेशद्वार, तटबंदी, सागरी दरवाजा, सतीचा पार, ध्वजस्तंभ, हनुमान मंदिर आणि नागेश महातीर्थावरही पणत्या तसेच तोरण लावून रांगोळी काढण्यात येणार आहे. यासाठी किमान एक पणती, तेल तसेच वाती घेऊन येण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.