घोलवडच्या जयप्रकाश बारी वाड्यातील चिमणीवालं घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:15 AM2019-04-10T00:15:10+5:302019-04-10T00:15:14+5:30
घराला घरपण देणारा ठेवा : पाहुण्यांकडून कौतुक
बोर्डी : या गावच्या टोकेपाडा येथील बारी वाड्यातील जयप्रकाश बारी यांच्या घराच्या ओटीवर रोज सायंकाळी शेकडो चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू येतो. त्याचे स्थानिकांना अप्रूप नसलं तरी घरी येणाऱ्या पाहुण्यांकडून विचारणा होऊन कौतुक होत असल्याचं बारी यांच म्हणणे आहे.
या गावच्या टोकेपाडा येथे डहाणू बोर्डी प्रमुख राज्य मार्गावर जयप्रकाश आणि अर्चना बारी या दाम्पत्यांचं घर आहे. हे सर्वसामान्य मध्यम वर्गीयांप्रमाणेच घर असलं, तरी येथे रोज सायंकाळी शेकडो चिमण्यांचा गोतावळा जमत असल्याने त्याला असामान्य महत्व प्राप्त झालं आहे. वर्षभरापूर्वी त्यांनी कागदाच्या बॉक्सला चिमण्यांना आतबाहेर जाता यावे, म्हणून जागा ठेवली आणि त्याला दोरी बांधून घराच्या वेगवेगळ्या भागात टांगून ठेवले. मात्र साप आणि मांजरीपासून त्याचे संरक्षण होईल याची विशेष काळजी घेतली. त्यानंतर त्यामध्ये दाणे आणि पाणी ठेवण्याचे काम त्यांची हर्ष व राशी ही दोन मुलं व पत्नी अर्चना यांना सुलभतेने करता येईल हे देखील पाहिले. शिवाय रोजच्या धकाधकीच्या जीवनातून सायंकाळची वेळ ते चिमण्यांना दाणे टाकण्याकरिता आवर्जून देतात. त्यांचा लळा चिमण्यांनाही लागला असून तिन्ही सांजेला ते ओटीवर दाणे घेऊन आल्यावर त्या भुर्रकन येऊन दाणे वेचायला येतात.
हा क्षण दिवसभराचा थकवा आणि ताण कमी करण्यासाठी लाभदायक असल्याचे ते म्हणतात. तर दाणे वेचून झाल्यावर अंधार पडताच लगतच्या झाडावर त्या डेरेदाखल होतात. हा प्रकार रोज सुरू असतो. त्यांच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांना त्याचे विशेष अप्रुप असून त्या बद्दल बारी कुटुंबियांचे विशेष कौतुक त्यांच्याकडून केले जाते. शिवाय घर किती मोठे वा सोयी सुविधांनी युक्त असण्यापेक्षा असा ठेवा असावा म्हणून त्यांना विशेष शाबासकी मिळते. तर जागतिक चिमणी दिनी त्यांना स्नेह्यांनी फोन करून शुभेच्छाही दिल्या.
अर्चना बारी या घोलवड येथील अंगणवाडी केंद्रात सेविका आहेत. अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे केंद्रातील बालकांना त्या चिऊकावूच्या गोष्टी आणि गाणी ऐकवतात. मात्र घरचा समृद्ध करणाºया अनुभवाच्या गोष्टीतून या लहानग्यांच्या मनावर संस्कार करण्याचे काम त्या सुंदररित्या करीत आहेत. दरम्यान या परिसरात झाडांची संख्या, शेती व बागायती असून मोबाईल टॉवर नसल्याने चिमण्यांची संख्या वाढली असल्याचे दिसून येते. हा वारसा टिकवायचा असल्यास टॉवर हद्दपार झाले पाहिजेत असे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे.
रोज सायंकाळी चिमण्यांना अंगणात दाणे टाकले जायचे, आता त्या थेट ओटीवरच येतात. ही संख्या झपाट्याने वाढत असून समृद्ध करणारा अनुभव आहे.
-जयप्रकाश बारी (घोलवड ग्रामस्थ)