परराज्यातही चिंचणी-वाणगाव मिरचीचा ठसका; घेतले जाते विक्रमी उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 01:50 AM2021-03-21T01:50:33+5:302021-03-21T01:50:46+5:30

गेल्या वर्षी कोरोनाची सुरुवात होऊन वाहतूक बंद पडल्याने ढोबळी मिरची आणि तिखट मिरचीचे उत्पादन घेणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले होते.

Chinchani-Vangaon chilli paste in foreign countries too; Record production is taken | परराज्यातही चिंचणी-वाणगाव मिरचीचा ठसका; घेतले जाते विक्रमी उत्पादन

परराज्यातही चिंचणी-वाणगाव मिरचीचा ठसका; घेतले जाते विक्रमी उत्पादन

Next

शौकत शेख

डहाणू : कोल्हापुरी मिरचीचा ठसका सर्वश्रुत आहे, परंतु पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील चिंचणी-वाणगावची मिरचीही आपले वेगळे अस्तित्व राखून आहे. मुंबई शहराला भाजीपाला पुरवठा करण्यात सिंहाच्या वाटा असलेल्या या परिसरातील बागायतदार सध्या मिरचीचे विक्रमी उत्पादन घेण्यात यशस्वी ठरत आहे. 

गेल्या वर्षी कोरोनाची सुरुवात होऊन वाहतूक बंद पडल्याने ढोबळी मिरची आणि तिखट मिरचीचे उत्पादन घेणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले होते. डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील अत्याधुनिक पद्धतीने वानगाव, चिंचणी, वरोर, वाढवण, बावडा, बडापोखराण, वासगाव, चंडीगाव, माटगाव, धूमकेत, आसनगाव, ऐना, गुंगवडा, डहाणूखडी, कांक्राडी या बागायतसमृद्ध भागात रब्बी हंगामात इस्रायल तंत्रज्ञानाचा वापर करून अत्याधुनिक पद्धतीने शेडनेटचा वापर करीत ढोबळी मिरची आणि तिखट मिरचीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जात आहे. सध्या उन्हाळा सुरू झाला असला तरी ठिंबक सिंचनद्वारे मिरचीची वाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. 
यंदा परिसरातील शेतकऱ्यांकडून सुमारे पाच ते सहा हजार एकर जमिनीवर ढोबळी मिरची, अचारी मिरची, हिरव्या मिरचीची लागवड करण्यात आली आहे. हे पीकही जोमदार आले आहे. येथून दररोज दोनशे टन मिरची मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिकसह गुजरात राज्यातील अहमदाबाद, सुरत, वापी येथील बाजारपेठेत रवाना होत आहे. काही वर्षांपूर्वी फक्त गवतांचे उत्पन्न घेणारे परिसरातील शेतकरी आधुनिक पद्धतीने भाजीपाला लागवड करीत आहेत. याआधी डहाणूच्या पश्चिम भागात भाजीपाला, फळभाज्या तसेच वेलवर्गीय भाज्यांपैकी दुधी भोपळा, पडवळ, कारली, वांगी, टोमॅटो, तोंडली, पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात होत असे, मात्र वेलवर्गीय भाज्या लागवडीमध्ये जास्त गुंतवणूक असल्याने तसेच बाजारपेठेतील भावांची अनिश्चितता यामुळे शेतकरी वेलवर्गीय भाज्यांची लागवड करण्यासाठी उत्सुक नाहीत. त्यांनी मिरचीचा फायदेशीर पर्याय स्वीकारला आहे. 

दरम्यान, डहाणूच्या पश्चिम भागातील चिंचणी, बावडा, वाणगावसारख्या भागांत सध्या सर्वात जास्त शिमला मिरचीचे उत्पादन सर्वाधिक आहे. येथील ढोबळी मिरचीची मागणी दिल्ली, मुंबईबरोबरच गुजरात राज्यातही आहे. दररोज येथून २०० टन मिरची पाठवली जात आहे.

इस्रायलमध्ये जाऊन शेतकऱ्यांनी केला अभ्यास
मिरचीची लागवड केल्यास त्यातून नुकसान होण्याची भीती नाही. संकरीत बियाणांमुळे हे पीक कोणत्याही रोगाला बळी पडण्याचा धोका कमी असतो. शिवाय चुकून एखादा रोग पडल्यास त्यावर तातडीने उपाय करून तो नियंत्रणात आणता येतो. तसेच मिरचीचे भावही आश्वासक असतात. यामुळे येथील बहुसंख्य शेतकरी मिरची पिके घेण्याकडे वळले आहेत. या परिसरातील शेतकरी इस्रायलसारख्या ठिकाणी जाऊन तेथील शेतीचा अभ्यास करून विविध तंत्रज्ञानाचा वापर करून ठिबक सिंचनाने पाण्याची बचत करून जास्तीत जास्त क्षेत्र लागवडीखाली आणून त्यातून विक्रमी उत्पादन घेण्यात येथील शेतकऱ्यांनी यश मिळविले आहे.

Web Title: Chinchani-Vangaon chilli paste in foreign countries too; Record production is taken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.