चायनिज मांजामुळे जातो अनेक निष्पाप पक्ष्यांचा हकनाक बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 12:12 AM2021-01-10T00:12:08+5:302021-01-10T00:12:18+5:30
प्राणिमित्र संस्थांकडून आवाहन
अनिरुद्ध पाटील
बोर्डी : मकरसंक्रांतीला तिळगुळाप्रमाणेच पतंगबाजीला विशेष महत्त्व आहे. मोकळी मैदाने, घराची गच्ची, समुद्रकिनारे आदी ठिकाणाहून पतंग उडविले जातात. आकाशात विविध आकार आणि रंगातील पतंगांचा खेळ मनाला आनंद देऊन जातो. मात्र पतंग उडविण्यासाठी लागणाऱ्या मांझ्यामुळे आकाशात स्वच्छंदी विहार करणाऱ्या पक्ष्यांना इजा पोहचून नाहक जीव गमवावा लागतो. या कालावधीत जिल्ह्यातील जखमी पक्ष्यांची संख्या मागील काही वर्षात घट झाली आहे. ही सकारात्मकता दाखवून पतंगबाजीला आवर घालण्याचे आवाहन वाईल्डलाइफ कन्झर्वेशन अँड ॲनिमल वेल्फेअर असोसिएशनने (डब्ल्यूसीएडब्ल्यूए) केले आहे.
पर्यावरण तसेच जैवसाखळीत पक्षी महत्त्वपूर्ण भूमिका वाजवतात. त्यामुळे त्यांचे संरक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येक व्यक्तीने स्वीकारली पाहिजे. शहरी आणि ग्रामीण भागात याबाबत संस्थेच्या माध्यमातून जनजागृती केली जाते. त्यामुळे मागील दोन वर्षात हे प्रमाण घटले आहे.
गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणावर पतंगबाजी केली जाते. ते शेजारील राज्य असले तरी जिल्हावासीयांनी पक्ष्यांच्या जीवितासाठी आपल्या संकल्पापासून विचलित होऊ नये. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी यंदा सोशल मीडियाच्या माध्यमातून जागृती केली जात असल्याची माहिती या प्राणीमित्र संस्थेने दिली. मकरसंक्रांतीला तिळगूळ वाटून सण साजरा करा, पतंगबाजीला आळा घालून पक्षीमित्र बना, असे आवाहन करण्यात येत आहे.
मांजामुळे पक्षी मृत्युमुखी
पतंगबाजी करताना हौशी नागरिकांची मौजमजा होत असली तरी चायनिज मांज्यामुळे पशू-पक्षी मात्र हकनाक आपल्या जीवाला मुकत आहेत. अशा अनेक घटना शहरांत घडत आहेत. पोलिसांनी कारवाई करावी, अशी अपेक्षा केली जात असली तरी पोलीस तरी कुठे कुठे पाहणार हा प्रश्नच आहे.
मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर होणारी पतंगबाजी लक्षात घेता पोलीस विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी पुढाकार घेऊन भित्तिचित्रे, फलक आणि स्लोगनच्या माध्यमातून जनजागृती करणे आवश्यक असल्याचे मत पक्षिप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी नागरिक आतापासूनच करताना दिसत आहेत.
चायनिज मांजा विकणाऱ्यांवर
दंडात्मक कारवाई
पतंग उडवणे हा मनोरंजनात्मक खेळ असला, तरी अनेक ठिकाणी पतंगासाठी मांजाचा वापर केला जातो. मांजा दोऱ्यात अडकून शहरासह अन्य ठिकाणी जीवघेणे अपघात घडले आहेत. चायनीज मांजा पशू, पक्षी आणि मानवी जीवनास घातक ठरत असल्यामुळेराष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने मांजा उत्पादन, साठा,
विक्री आणि खरेदीवर बंदी घातलेली असून दंडात्मक कडक कारवाई करण्याचेही आदेश प्रशासनाला दिलेले आहेत.
पतंगाची दोरी झाडाला गुंडाळली जाऊन, त्यामध्ये पक्षी अडकून अपघात घडतात. संस्थेच्या जनजागृतीला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे.
- धवल कंसारा,
मानद वन्यजीव रक्षक, पालघर