घरपट्टी वाढी विरोधात चौकसभा; गावकरी एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 02:30 AM2018-01-09T02:30:24+5:302018-01-09T02:30:30+5:30
वसई विरार महापालिकेने जनतेवर लादलेल्या अनावश्यक व अन्यायकारक वाढीव घरपट्टीविरोधात जनजागरण करण्यासाठी जनआंदोलन समितीच्या वतीने गावागावात चौकसभा घेतल्या जात आहेत.
वसई : वसई विरार महापालिकेने जनतेवर लादलेल्या अनावश्यक व अन्यायकारक वाढीव घरपट्टीविरोधात जनजागरण करण्यासाठी जनआंदोलन समितीच्या वतीने गावागावात चौकसभा घेतल्या जात आहेत.
पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय नाही. आरोग्य, औषधोपचाराची सोय नाही. परिवहन सेवा नाही. सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था नाही. अनेक पायाभूत सुविधा नाहीत. अशा स्थितीत घरपट्टीचा बोजा सामान्य नागरीकांवर टाकल्याबद्दल लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
कायदेशीर प्रक्रिया पार पाडून न्यायिक अशी वाजवी घरपट्टी आकारण करण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही घरपट्टी भरणार नाही, असा ठराव सभेत एकमताने मंजूर करण्यात आला. या सभेला अॅड. जॉर्ज फरगोस, उपाध्यक्ष नंदू महाजन, संघटक जोजेफ वर्गीस, राजू वर्तक यांनीही मार्गदर्शन केले.
बहुमताच्या जोरावर जनक्षोभ दाबण्याचा प्रयत्न
ग्रामपंचायत असताना मुळगावकरांनी अन्यायकारक आकारलेल्या घरपट्टीचे डिमांड रजिस्टर मुंबई हायकोर्टाकडून रद्द करून घेतले होते, अशी माहिती समितीचे अध्यक्ष मिलिंद खानोलकर यांनी एका सभेत बोलताना दिली.
तरतुदीनुसार वाढीव घरपट्टीबाबत पूर्व सूचना देऊन त्यावर सूचना व हरकती मागून त्यांना रितसर सुनावणी देऊनच वाढीव घरपट्टी नियमित करणे कायद्याने बंधनकारक आहे. पण, बहुमताच्या जोरावर या प्रक्रीयेला फाटा दिला जात आहे.