शेव, चकली, चिवडा, शंकरपाळी : नाताळच्या फराळातून साधतोय एकोपा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 03:41 AM2018-12-24T03:41:26+5:302018-12-24T03:41:43+5:30
आजही वसईत केक, डोनट्स, फुगे, विविध मिठाई प्रकाराबरोबर दिवाळी सारखेच घरोघरी लाडू, करंज्या, चिवडा, शंकरपाळी आदी पदार्थ बनविले जात आहेत.
वसई : पोर्तुगीजांच्या राजवटीत जी काही धर्मातरे झाली त्यात वसई-विरारमधील ख्रिस्ती समाज प्रामुख्याने येतो. सोळाव्या शतकापासून जर का इतिहास पाहिला तर मराठ्यांनी मिळविलेल्या विजयानंतरही मराठा सैन्य नाताळ निमित्त वसई किल्ल्यामध्ये घोडेस्वारी करून सलामी देत असे. धर्मातरे झाली पोशाख बदलले मात्र संस्कृती तसेच खाद्य संस्कृतीचा वारसा आजही वसईत पाहण्यास मिळत आहे. म्हणूनच आजही वसईत केक, डोनट्स, फुगे, विविध मिठाई प्रकाराबरोबर दिवाळी सारखेच घरोघरी लाडू, करंज्या, चिवडा, शंकरपाळी आदी पदार्थ बनविले जात आहेत. मित्रवर्गाकडून दिवाळी निमित्ते आलेल्या फराळाची परतफेड नाताळच्या काळात ख्रिस्ती बांधव करीत असतात.
वसईतील ख्रिस्ती परिसरातून जर का आपण फेरफटका मारला तर आपलयाला घरोघरी रोषणाई, खिडकीला किंवा दारासमोर लावली चांदणी, ख्रिस्त जन्म देखाव्याबरोबर या सर्व सुगंधी पदार्थांचा घमघमाट सुटलेला अनुभवण्यास मिळेल.
वसईचा ख्रिस्तीसमाज हा धर्माने जरी एकत्र बांधला गेला असला तरी आपल्या बोलीभाषा व संस्कृती प्रमाणे दोन भागात ओळखला जातो. वसई पश्चिम पट्टयÞात असलेला ख्रिस्ती समाज ‘वाडवळ’, तर विरार व नालासोपारा पश्चिम भागात राहत असलेला समाज ‘कुपारी’ म्हणून ओळखला जातो. गिरीज, तमतलाव या भागात वळकर , म्हणजेच गोवेकर समाज मागील अनेक पिढ्या इथे राहत आहे. याच्या जेवण बनविण्याची पद्धत तसेच फराळातही आपल्याला बराच फरक दिसून येतो.