जव्हार-सिल्व्हासा रस्त्याच्या मोरीच्या अपूर्ण कामामुळे नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 11:56 PM2019-04-25T23:56:05+5:302019-04-25T23:56:12+5:30
तीन वर्षांपासून अपूर्णच; दुचाकीचालकांची तारेवरची कसरत
- हुसेन मेमन
जव्हार - जव्हार ते सेलवास रस्त्याचे दुपदरीकरणाचे काम सुरू असुन डबकपाडा ते वडोल रस्त्यात ५ ते ६ मोठे बंधारे येत असुन गेल्या तीन वर्षापासुन ठेकेदाराने हा रस्ता फक्त उकरुन ठेवला आहे. काही ठिकाणी मोरीचे बांधकाम सुरू असून थातुर मातुर पध्दतीने बांधलेला तात्पुरता रस्ता असून सर्वत्र मातीच माती आहे. त्यावरुन प्रवास करतांना मोठा त्रास होत असून मोरीचे काम तात्काळ पूर्ण करावे अशी मागणी होत आहे.
मोरीचे काम ठिकठिकाणी बंद पडलेले असुन बांधलेल्या निकृष्ट रस्त्याचीही दैना झालेली आहे. या मार्गावरून पुढे सेलवासा दादरा नगर हवेली कडे जाणार रस्ता असल्यामुळे अवजड वाहनांची येथुन ये-जा सुरू असते. मात्र, ठिकठिकाणी मोरीचे काम अपुर्ण असल्यामुळे वाहन चालकांना रस्त्यावरून वाहन हाकताना कसरत करावी लागते. तसेच, पावसाळ्याच्या काळात या रस्त्यावरून पुढे दाभोसा हे पर्यटन स्थळ असुन हजारोच्या संख्येने पर्यटक या रस्त्याचा वापर करतात. मात्र एप्रिल महिना संपत आला आहे. पावसाळा सुरु होण्यास एक महिना शिल्लक असताना काम अपुर्ण असल्याने ठेकेदारावर कारवाईची मागणी होत आहे. तसेच, ज्या ज्या ठिकाणी कामे सुरू आहेत अशा ठिकाणी कुठलेच सुचनेचे फलक नसल्याने अपघात घडत आहेत.
याकडे बांधकाम विाभागाचे दुर्लक्ष झालेले असुन तातडीने अपुर्ण असलेल्या मोऱ्या व नव्याने तयार करून मार्गक्रम नियमित करण्यात यावा तसेच जो पर्यत रस्त्याचे काम पुर्ण होत नाही तो पर्यत प्रवाशांंना धुळीमुळे होणाºया त्रासावर उपाय योजना करावी अशी मागणी होत आहे.
या बाबात ठेकेदाराला वारंवार ताकीद दिलेली असुन, नुकतेच पुन्हा त्यांना मोरीचे अपुर्ण काम तातडीने पुर्ण करण्याच्या सुचना दिल्या आहेत. लवकरच काम सुरू करण्यात येईल. -डि. डि. पाटील, शाखा अभियंता,
सा. बां.विभाग, जव्हार