नायगाव खाडीपुलाचे काम ठप्प झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 12:22 AM2020-10-02T00:22:53+5:302020-10-02T00:23:10+5:30
आता झोपड्यांचा अडथळा : पाच वर्षांपासून सुरू असलेल्या पाठशिवणीच्या खेळामुळे स्थानिकांची उत्कंठा आणि संताप
पारोळ : रडतखडत सुरू असलेल्या नायगाव खाडी पुलाचे काम पुन्हा ठप्प झाल्याने नायगाव परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अनेक वेळा अडथळ्यांचा सामना करत सुरू असलेल्या पुलाच्या कामात काही ना काही अडथळ्यांचा खोडा येत असल्याने हा पुल कधी पूर्ण होणार,
असा संतप्त सवाल येथील नागरिकांनी केला आहे. पीडब्ल्यूडी प्रशासनाची उदासीन भूमिका तसेच कंत्राटदाराकडून पुलाच्या कामात सुरू असलेला कासवछाप कारभार नागरिकांच्या संतापाला खतपाणी घालू लागला आहे. याआधी असलेल्या अडथळ्यांचा सामना करत असलेल्या नायगाव खाडीपुलाच्या उतारकामात आता येथील झोपड्यांचा नवा अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे लॉकडाऊन काळात सुरू झालेल्या पुलाचे अर्धवट काम पुन्हा एकदा ठप्प झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नायगाव खाडी पुुलाच्या पश्चिम बाजूस असलेल्या फेरीवाल्यांच्या झोपड्या हटवण्यावरून जमिनीचा ताबा असलेल्या शेतकऱ्यांचा वाद झाला आहे. या शेतकऱ्यांना या जागेचा मोबदला पाहिजे आहे. याबाबत पीडब्ल्यूडी प्रशासनाने महापालिका प्रशासन आणि संबंधित विभागास सदर शेतकºयांना मोबदला मिळावा यासाठी पत्रव्यवहार केला आहे. नायगाव खाडी पुलाच्या बाबतीत मागील ५ वर्षांपासून सुरू असलेल्या पाठशिवणीच्या खेळामुळे नागरिकांची उत्कंठा वाढली आहे. पूल कधी सुरू होईल यासाठी नागरिक संभ्रमात आहेत. मध्यंतरी कोरोना आपत्तीमुळे खाडीपुलाचे काम बंद ठेवण्यात आले होते. मात्र जून महिन्यात वसई-विरार महापालिकेने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर या खाडीपुलाच्या कामालाही सुरुवात करण्याच्या हालचाली पीडब्ल्यूडी प्रशासनाकडून सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र लॉकडाऊन शिथिल असतानाही खाडीपुलाचे काम पुन्हा एकदा ठप्प करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
महापालिकेने दिला एक कोटीचा निधी
वसई-विरार महापालिकेने या पुलाच्या कामासाठी १ कोटी १ लाख ७४ हजारांचा निधी दिला आहे. मात्र निधी देऊनही पुलाचे काम पूर्ण होत नसल्याने नागरिकांचा संताप वाढत चालला आहे. पुलाचे काम रेंगाळल्यानंतर महापालिका प्रभाग समिती ‘जी’चे माजी सभापती कन्हैया (बेटा) भोईर यांनी पीडब्ल्यूडी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर पुलाचे काम तात्काळ पूर्णत्वास नेले नाही तर स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशारा कन्हैया भोईर यांनी दिला आहे.