भटक्या कुत्र्यांमुळे नागरिक हैराण, नसबंदी मोहिमेत पालिका अयशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2019 01:00 AM2019-11-25T01:00:06+5:302019-11-25T01:00:38+5:30
वसईतील नाक्या-नाक्यावर मध्यरात्रीनंतर भटक्या कुत्र्यांची दहशत असून नागरिकांना जीव मुठीत धरुन जावे लागत आहे.
- मंगेश कराळे
नालासोपारा : वसईतील नाक्या-नाक्यावर मध्यरात्रीनंतर भटक्या कुत्र्यांची दहशत असून नागरिकांना जीव मुठीत धरुन जावे लागत आहे. जागोजागी भटके कुत्रे दिसत असल्याने वसईकर हैराण झाले आहेत. भटक्या कुत्र्यांची नसबंदी आणि रेबीज इंजेक्शनसाठी महानगरपालिकेने खर्च केल्याचा दावा केला आहे. महानगरपालिकेच्या संबंधित विभागाने दिलेल्या माहितीनुसार २०११ ते २०१९ च्या दरम्यान अंदाजे २७ हजार कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली असून प्रत्येक कुत्र्याला अंदाजे १ हजार १३ रुपये खर्च करण्यात आला आहे. पण, लाखो रुपये खर्च करूनही भटक्या कुत्र्यांच्या संख्या कमी होण्याऐवजी महानगरपालिकेच्या उदासीन कारभारामुळे त्यात लक्षणीय वाढ झाली आहे.
वसई - विरार शहर महानगरपालिकेने आॅक्टोबर २०११ मध्ये शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्याची मोहीम सुरू केली होती. भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची एखादी बातमी प्रसिध्द झाली की त्या विषयावर सर्वत्र चर्चा होते. कालांतराने ती थंडावते. मुले, शालेय विद्यार्थी, सायकल तसेच बाईकस्वार, कचरा गोळा करून उपजीविका चालविणारे लोक भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याचे बळी ठरत आहेत. भटक्या कुत्र्यांनी रात्री-अपरात्री केलेल्या पाठलागामुळे बाईकस्वारांचे गोंधळून अपघात होतात. त्यात गंभीर दुखापती होऊन जीव जाण्याचेही प्रकार घडत आहेत. भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे इमारती तसेच संकुलाच्या शेजारील कचराकुंडीमधील कचरा सर्वत्र पसरवून त्यामुळे दुर्गंधी तसेच आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत या विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी विचारणा केल्यानंतर त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, रोज १५ ते १८ भटक्या कुत्र्यांची नसबंदी केली जाते. पण एक कुत्री ५ ते ६ पिल्लांना जन्म देते. यामुळे कुत्र्यांची संख्या कमी होण्याऐवजी झपाट्याने वाढत आहे.
शहरातील भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन कुत्र्यांच्या निर्बीजीकरण करण्यासाठी महापालिका प्रशासनास एक नियोजनबध्द तसेच कालबद्ध कालबध्द कार्यक्रम आखून त्याची सत्वर अंमलबजावणी करण्याबाबतेच आदेश देणे गरजेचे आहे.
भटक्या कुत्र्यांसाठी लाखो रु पयांचा केला खर्च....
भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीबाबत वसई - विरार मनपाने २०१५-२०१६ मध्ये १३ लाख ७८ हजार रु पये, २०१६-२०१७ मध्ये ३३ लाख ४३ हजार रुपये, २०१७-२०१८ मध्ये ५६ लाख २५ हजार रुपये तर २०१८-२०१९ साली ६० लाख रुपये असा गेल्या चार वर्षांत एकूण १ करोड ६३ लाख ४६ हजार रु पये खर्च केला आहे.
नसबंदीसाठी सेंटरची संख्या वाढविणे गरजेचे......
भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच नसबंदी करण्यासाठी लागणाºया सेंटरची संख्या वाढविणे काळाची गरज आहे. सध्या वसईमध्ये एकमेव सेंटर वसई पूर्वेकडील स्मशानभूमीजवळ आहे.
महानगरपालिकेकडे एकमेव नसबंदी सेंटर असल्याने कमीत कमी ३ ते ४ सेंटर नव्याने उभारली पाहिजे. भटक्या कुत्र्यांची नसबंदी मोहीम २०११ सालापासून सुरू असून यापुढेही सुरूच राहणार.
- विजय पाटील
(सेंटर अधिकारी, वसई विरार महानगरपालिका)