महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराचा नागरिकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 01:05 AM2019-08-07T01:05:48+5:302019-08-07T01:06:05+5:30
नुकसानभरपाई कोण देणार? : नालासोपारा पश्चिमेकडील पाणी ओसरेना
नालासोपारा : शनिवारी रात्रभर नालासोपारा शहराला पावसाने झोडपल्यामुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. पावसाने तुफान बॅटिंग केल्याने नागरिकांच्या घरात आणि दुकानांमध्ये पावसाचे पाणी घुसून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
पावसाळ्यापूर्वी मनपाने करोडो रुपये खर्च करून केलेली गटारे, नाले व्यवस्थित साफ करून घेतले असते किंवा पावसाचे पाणी साचू नये म्हणून उपाययोजना केली असती तर या पावसाळ्यात नालासोपारकरांना दुसऱ्यांदा या परिस्थितीला तोंड द्यावे लागले नसते.
लोकप्रतिनिधींनी दक्षता न घेतल्याने प्रत्येकाच्या प्रभागात पावसाचे पाणी साचले. या पावसामुळे जे नुकसान झाले आहे ती नुकसानभरपाई कोण देणार असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. पूर्वेकडील पाणी ओसरले असले तरी पश्चिमेकडील अनेक परिसरात आताही मोठ्या प्रमाणात पाणी असून अनेक इमारतीच्या तळमजल्यावर सोमवारी गुडघाभर पाणी होते.
कोणतीही सुविधा करण्यात आली नाही
वसई तालुक्यात पूरजन्य स्थिती निर्माण झाल्याने ५०० ते ६०० लोकांचे स्थलांतर जिल्हाधिकारी कैलास शिंदे, तहसीलदार किरण सुरवसे, एनडीआरएफची टीम, पालघर पोलीस, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त आणि अिग्नशामक दलाच्या जवानांनी शनिवारी रात्रीपासून ते रविवारी संध्याकाळपर्यंत केले होते पण नालासोपारा पश्चिमेकडील छेडा नगर, हनुमान नगर, एस टी डेपो रोड, पाटणकर पार्क याठिकाणी परिस्थिती पाहण्यासाठी कोणीही अधिकारी अथवा कर्मचारी साधा फिरकलाही नाही. पुराचे पाणी घरात शिरलेल्या नागरिकांनी रविवारची रात्र अंधारात इमारतीच्या टेरेसवर काढली पण महानगरपालिकेची आपत्कालीन व्यवस्थेचे अधिकारी, कर्मचारी, निवडणूकीत मते मागणारे लोकप्रतिनिधी साधे फिरकले सुद्धा नाही यामुळे लोकांमध्ये असंतोष आहे.
वीजपुरवठा सुरळीतपणे......
नालासोपारा शहरात पाणी साचल्याने अनेक परिसरातील वीज रविवारी पहाटे घालवण्यात आली होती. तर ज्या परिसरातील पावसाचे पाणी ओसरले होते त्या परिसरात रविवारी रात्री वीजपुरवठा सुरळीत केला होता. पश्चिमेकडील अनेक परिसरात पाण्यामुळे रविवारी रात्रभर वीजपुरवठा खंडित होता पण सोमवारी सकाळी महावितरणचे वायरमन, कर्मचारी ज्या ज्या परिसरात साचलेले पाणी ओसरले त्या त्या परिसरात जाऊन बघितल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करत होते.
सदर पावसाच्या पाण्याचा फ्लो पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. पावसाळ्यापूर्वी अलकापुरी येथून पाईप टाकण्यात आलेला आहे. पश्चिमेकडील परिसरात जेथून पाणी जाते ते फुल असल्याने ते कमी झाल्यावर पश्चिमेकडील परिसरातील पावसाचे पाणी कमी होईल.
- बळीराम पवार (आयुक्त, वसई विरार शहर महानगरपालिका)