भिवंडी खड्ड्यांचे शहर; शहराला नवी ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 11:08 PM2019-08-07T23:08:20+5:302019-08-07T23:08:34+5:30

कोट्यवधींचा चुराडा, प्रशासनावर संताप

City of Bhiwandi Pits; New introduction to the city | भिवंडी खड्ड्यांचे शहर; शहराला नवी ओळख

भिवंडी खड्ड्यांचे शहर; शहराला नवी ओळख

googlenewsNext

भिवंडी : भिवंडीतील रस्त्यांची अक्षरश: दुरवस्था झाल्याने उद्योगनगरी म्हणून ओळख असलेल्या भिवंडी शहराची खड्ड्यांचे शहर अशी नवी ओळख निर्माण झाली आहे. मात्र, रस्त्यांच्या या दुरवस्थेकडे पालिका प्रशासन, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक नागरिकांसह प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यांवर कोट्यवधी खर्च केले होते. त्याचा चुराडा झाला आहे. यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची चर्चा सुरू आहे. शहरातील सर्वच रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असल्याने रस्त्यांवर खड्डे की, खड्ड्यांत रस्ते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

शहराच्या प्रत्येक चौकांत, बाजारपेठांत, गल्लीबोळांत असलेल्या रस्त्यांवर खड्डेचखड्डे पडल्याने हे चुकवताना नागरिकांना आपले जीव गमवावे लागत असून काहीजण जखमी होत आहेत. विशेष म्हणजे महापालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर व प्रांत कार्यालयासमोरच मोठे खड्डे पडले आहेत. या कार्यालयात दररोज शेकडो नागरिक कामासाठी येतात. त्याचप्रमाणे तहसीलदार, पंचायत समिती, दुय्यम निबंधक, सेतू कार्यालय, तालुका पोलीस ठाणे, गुन्हे अन्वेषण विभाग, तलाठी, सर्कल कार्यालये आदी कार्यालयांसमोरही खड्डे पडले आहेत.

या कार्यालयामध्ये कामानिमित्त दररोज नागरिक येतात. मात्र, या नागरिकांना खड्डे आणि त्यामध्ये साचलेले पाणी, चिखल तुडवून कार्यालये गाठावी लागत आहेत. याच रस्त्यांनी संबंधित विभागाचे अधिकारी येतात, मात्र त्यांचेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खड्डे भरण्यासाठी प्रशासन दगड, ग्रीड पावडर व खडीचा वापर करत असल्याने मुसळधार पावसात ही खडी रस्त्यांवर पसरत असल्याने वाहने घसरून अपघात होत आहेत. खड्ड्यांमुळे रोजच वाहतूककोंडीही होत आहे.

१५ मिनिटाच्या अंतरासाठी २ तास
शहरातील मंडई , तीन बत्ती, शिवाजी चौक, वंजारपट्टी नाका , आनंद दिघे चौक, राजीव गांधी चौक, धामणकर नाका, अंजूर फाटा या चौकामधून जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर खड्डे असून चालकांना कसरत करावी लागत आहे. ५ ते १० मिनिटांच्या अंतरासाठी १ ते २ तास वाया घालवावे लागत आहेत .
खड्ड्यांमधून वाहन चालवताना चालकांना कसरत करावी लागत असून काहींना पाठ, कंबरदुखीचा त्रास होऊ लागला आहे. पालिकेच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे.

Web Title: City of Bhiwandi Pits; New introduction to the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Potholeखड्डे