वसईत दोन गटांमध्ये भीषण राडा; परस्परांविरोधात गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 11:39 PM2020-04-24T23:39:19+5:302020-04-24T23:44:27+5:30
माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गंभीर घटना; कुणालाही अटक नाही
वसई- वसईच्या नवघर माणिकपूर शहरातील स्टेला स्थित अरुणोदय नगर हौसिंग सोसायटीत राहणाऱ्या दोघा सदस्यांनी हौसिंग सोसायटीचे नियम तोडले याचा जाब विचारल्याच्या शुल्लक कारणावरून सोसायटी मधील दोन गटात भीषण राडा झाल्याची गंभीर घटना गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली आहे.
दरम्यान या हौसिंग संकुलातील दोन गटातील भीषण राडेबाजीमुळे सोसायटीत व आजूबाजूच्या परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर माणिकपूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी आपल्या फौजफाट्यासह सोसायटीत धाव घेतल्याने पुढील मोठा अनर्थ टळला आहे. या संदर्भात माणिकपूर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी दोन गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती माणिकपूर पोलीस निरिक्षक राजेंद्र कांबळे यांनी लोकमत ला दिली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन घोषीत आहे.त्यात सोसायटी संकुलात कार्यकारी मंडळाने काही सूचना व नियम तयार केले असताना या घटनेतील आरोपींनी नियमांचे पालन न केल्याने त्याचा जाब विचारायला गेलेल्या प्रशांत गोरे यांच्या सहित इतर तिघांना आरोपी अवणेश निवेकर व जॉन फर्नांडिस यांनी लोखंडी दांडक्याने तसेच विटा,व लोखंडी कुऱ्हाड व चाकूच्या सहाय्याने मारहाण करीत गंभीर जखमी केले.
या भीषण मारहाणीत प्रशांत गोरे,उमेश वेदक,प्रशांत शिपूरकर,उद्धव वेदक (सर्व रा.बरामपूर) हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी जखमी प्रशांत गोरे यांच्या फिर्यादीवरून माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि.क्रं.178 /2020 दाखल करण्यात आला आहे. तर याच संकुलातील दुसऱ्या गटाकडून दिलेल्या गुन्हा रजि.क्र.179 /2020 फिर्यादी नुसार यातील पाच आरोपी पैकी एकाने आधी फोन करून बोलावून घेतले व तुम्ही वेळेचे पालन करीत नाही असे सांगताच फिर्यादी व त्याच्या भावाला आरोपी प्रशांत गोरे, उमेश वेदक, उद्धव वेदक, वेली परेरा व उद्धव वेदक यांच्या पत्नी (नाव माहित नाही) या सर्वांनी मिळून अवणेश निवेकर व त्याचा भाऊ जॉनी फर्नांडिस यांना विटेच्या साहाय्याने मारहाण केली असता ते दोघे जण जखमी झाले.
परिणामी माणिकपूर पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत या दोन्ही गुन्ह्यातील सातही आरोपींची सोसायटीत येऊन सोड्वा सोडवी करीत सर्वांना ताब्यात घेऊन दोन्ही गटातील घटनाक्रम पाहता परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी माणिकपूर पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी घटनास्थळी स्वतः भेट देऊन हे गंभीर प्रकरण शांत केले असून या एकूणच घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत यांच्याकडे दिला आहे.
"अरुणोदय नगर सोसायटीत झालेली घटना गंभीर आहे, या मारहाणीत दोन गटात दोन परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले असून कोरोना मुळे आपण प्रथमदर्शनी या सर्वांना 41 व 149 च्या नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
- पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे
माणिकपूर पोलीस ठाणे,वसई रोड
लॉकडाऊन काळात वसईची कायदा सुव्यवस्था ढासळतेय का?
वसईत लॉकडाऊन काळात किरकोळ वादातून खुनाच्या तीन घटना ताज्या असताना गुरुवारी हि चौथी घटना भीषण मारहाणीची घडली खरी मात्र योग्य वेळीं पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानेच मोठा अनर्थ टळला. मात्र त्याची दाहकता फार गंभीर स्वरूपाची असून भविष्यात हा वाद पुन्हा उफाळून आला तर तो एका गंभीर गुन्ह्याचे स्वरूप नक्कीच धारण करू शकेल.