विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला! विरारमध्ये घराला लागलेल्या आगीत बारावीच्या उत्तरपत्रिका जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 14:33 IST2025-03-13T14:30:19+5:302025-03-13T14:33:33+5:30
विरारमध्ये बारावीच्या उत्तर पत्रिका तपासण्यासाठी आणलेल्या शिक्षिका महिलेच्या घराला आग लागल्याने आगीमध्ये बारावीच्या उत्तर पत्रिका जळून खाक झाल्या आहेत.

विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला! विरारमध्ये घराला लागलेल्या आगीत बारावीच्या उत्तरपत्रिका जळून खाक
मंगेश कराळे
नालासोपारा :- नुकत्याच बारावीच्या परीक्षा पार पडल्या. परीक्षेचे टेन्शन गेल्याने विद्यार्थी निर्धास्त झालेत. पण काही महिन्यांतच लागणाऱ्या निकालाचेही टेन्शन आहेच की... दुसरीकडे शिक्षकांचीही बारावीच्या उत्तर पत्रिका तपासणीची लगबग सुरू आहे. अशातच विरारमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली असून शिक्षिकेच्या घरी लागलेल्या आगीमध्ये बारावीच्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्याने खळबळ उडाली आहे. ऐन शिमग्याच्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका आगीच्या भक्षस्थानी गेल्यामुळे विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलं आहे.
विरारमध्ये बारावीच्या उत्तर पत्रिका तपासण्यासाठी आणलेल्या शिक्षिका महिलेच्या घराला आग लागल्याने आगीमध्ये बारावीच्या उत्तर पत्रिका जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन जवानांनी घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळवले यामध्ये कोणतेही जीवितहानी झाली नसली तरी बारावीच्या विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीवर लागलं आहे. विरारच्या आगाशी येथील गंगुबाई अपार्टमेंट परिसरात ही घटना घडली आहे. शिक्षिकेने १२ वी कॉमर्सच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी घरी आणली होत्या. कामानिमित्त शिक्षिकेच्या घरातील लोक बाहेर गेले. त्यांचे घर बंद असतानाच शॉर्ट सर्किट झाल्याने घरामध्ये मोठी आग लागली, ज्यामध्ये या पेपरसह घरातील इतर सामानही जळून खाक झालं आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, बारावीच्या उत्तर पत्रिका कॉलेजमध्येच तपासणं बंधनकारक असताना शिक्षिकेने नियम तोडून त्या घरी कशा नेल्या? असा सवाल आता उपस्थित होत आहे. पेपर तपासणीसाठी घरी कसे आणले? असा सवाल उपस्थित करत नागरिकांनी या घटनेवरुन संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याचा विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम होण्याची शक्यता आहे.