दहावीच्या विद्यार्थ्यांना अद्याप निकाल नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 11:50 PM2019-09-23T23:50:40+5:302019-09-23T23:50:48+5:30
वाडा तालुक्यातील प्रकार : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; शिक्षण विभागाविरोधात धरणे
वाडा : तालुक्यातील मानिवली येथील प्रल्हाद शिक्षण मंडळाच्या बबनराव गणपत पाटील माध्यमिक विद्यालयाच्या जवळपास ५४ विद्यार्थ्यांच्या शालांत परीक्षेचा निकाल अद्याप न मिळाल्याने त्यांचे शैक्षणकि नुकसान होत असून वर्ष वाया जाण्याची भीती विद्यार्थी तसेच पालकांना भेडसावते आहे. हा निकाल त्वरित देण्याची मागणी त्यांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे केली आहे. या मागणीसाठी सोमवारी आंदोलन करण्यात आले.
तालुक्यातील मानिवली येथे बबनराव गणपत पाटील माध्यमिक विद्यालय असून २०१६ - १७ मध्ये या शाळेची स्थापना झाली. दरवर्षी या विद्यालयातून नववी आणि दहावीचे विद्यार्थी शिक्षण घेत असतात. मात्र, या शाळेस शासकीय मान्यता नसल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांना इतर शाळांमधून परीक्षेस बसवले जाते. यंदाही ५४ विद्यार्थ्यांना विक्र मगड तालुक्यातील साखरे येथील विद्यालयातून परिक्षेस बसवण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क संस्थेकडे जमा देखील केले होते. मात्र संस्था चालकांनी हे शुल्क परिक्षा मंडळाकडे न भरल्याने त्यांचे निकाल रोखण्यात आल्याचा आरोप विद्यार्थी पूनम बरफ, वैष्णवी वाघ आणि पालकांनी केला आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी धरणे आंदोलन केले.
संस्थेने परीक्षा मंडळाकडे विद्यार्थ्यांचे शुल्क न भरल्याने त्यांचा निकाल राखून ठेवल्याचे संस्थेचे विश्वस्त संतोष साठे यांच्याकडून मला समजले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नसून त्यांचा निकाल आल्यानंतर दुसऱ्या शाळेत प्रवेश दिला जाईल. - जयवंत खोत,
गटशिक्षणाधिकारी, वाडा पंचायत समिती शिक्षण विभाग
विद्यार्थ्यांची अतीविलंब फी ४ लाख ६१ हजार न भरल्याने बोर्डाने निकाल रोखून धरले आहेत. संस्थेने शाळा बंद केली असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून येत्या पंधरा दिवसांत निकाल प्राप्त करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत.
- संतोष साठे, विश्वस्त, प्रल्हाद शिक्षण मंडळ