कर्मचारी आयोगाकडून महापालिकेची ‘सफाई’; कामगारांना सुविधा पुरवण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 12:54 AM2020-02-03T00:54:23+5:302020-02-03T00:54:28+5:30
सफाई कर्मचाऱ्यांना सुविधा पुरवण्याचे आणि त्यांच्यासंबंधी असलेल्या बहुतेक योजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही आयोगाने महापालिकेला दिले आहेत.
वसई : वसई-विरार शहर महापालिका हद्दीत साफ-सफाईचे काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या सोयी-सुविधा मिळत असल्याचे कडक ताशेरे राज्य सफाई कर्मचारी आयोगाने महापालिकेच्या दौऱ्यावर आलेल्या भेटीत ओढले आहेत. सफाई कर्मचाऱ्यांना सुविधा पुरवण्याचे आणि त्यांच्यासंबंधी असलेल्या बहुतेक योजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही आयोगाने महापालिकेला दिले आहेत.
वसई-विरार शहरातील सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे मुंबई उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी पालघरसह वसई-विरार शहर महापालिकेला भेट दिली. सफाई कर्मचाºयांच्या समस्या सोडवण्यासाठी पालिका मुख्यालयात विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सफाई कर्मचारी आयोग हा सफाई कर्मचाºयांच्या ज्या समस्या असतील त्या सोडवण्याचे काम करत आहे. तसेच कर्मचाºयांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे.
जर सफाई कर्मचाऱ्यांना त्यांचे न्याय्य हक्क मिळत नसतील तसेच सफाई कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय झाला तर त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असेही आयोगाने या वेळी स्पष्ट केले आहे. तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या ज्या समस्या व अडचणी असतील आणि पालिका स्तरावर सुटत नसतील तर थेट आयोगाकडे तक्रार करा, अशी सूचना आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी केली आहे.
आयोगाच्या सूचना
महापालिकेतर्फे सफाई कर्मचाऱ्यांना मिळणारा धुलाई भत्ता केवळ ५० रुपये आहे. हा भत्ता किमान ५०० रुपये देण्यात यावा. कर्मचाºयांना राहण्यासाठी निवासस्थान उपलब्ध असले पाहिजे. यासाठी शासनाच्या ‘श्रमसाफल्य’ योजनेअंतर्गत राहण्यासाठी घरे उपलब्ध करून द्यावी.
लाड समितीच्या शिफारशीनुसार योजनांचा लाभ, पदोन्नती, वेळेत मासिक वेतन, सुरक्षाविषयक साधने, आरोग्य विषयक शिबिरे अशा विविध प्रकारच्या योजना पालिकेने कर्मचाºयांसाठी सुरू कराव्यात, असे आदेशात म्हटले आहे.