ओसीसाठी ‘त्या’ सेप्टिक टँकची साफसफाई, मैला साफ करताना तिघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 11:14 PM2019-05-03T23:14:56+5:302019-05-03T23:15:08+5:30
नालासोपारा पश्चिमेकडील निळेगावातील आनंद व्ह्यू इमारतीला वसई विरार मनपाची ओसी मिळवण्यासाठी बांधकाम व्यवसायिकांनी सेप्टिक टँक करण्याचे ठरवले होते.
नालासोपारा : नालासोपारा पश्चिमेकडील निळेगावातील आनंद व्ह्यू इमारतीला वसई विरार मनपाची ओसी मिळवण्यासाठी बांधकाम व्यवसायिकांनी सेप्टिक टँक करण्याचे ठरवले होते. गेल्या दोन वर्षांपासून येथे लोक राहत असून सोसायटी रहिवाशांना हस्तांतरण करण्यासाठी व पाणी मिळवण्यासाठी ओसी गरजेची असल्यामुळे सेप्टिक टँक साफसफाई करण्याचे ठरविले होते.
सेफ्टी टँक साफ करण्यासाठी सक्शन पंप किंवा मनपाची टँक साफसफाई करण्याची गाडी असतानाही पैसे कमविण्यासाठी तिघांना कोणतीही सुरक्षेसाठी काळजी न घेता, ऑक्सिजन मास न लावता टाकीत उतरल्याने तिघांनी गुदमरून जीव गमावला जर सक्शन पंप असता तर तिघांचे प्राण वाचले असते असे इमारतीमधील रहिवाश्यांनी सांगितले आहे. तिघांचे मृतदेह अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी रात्री अडीचच्या सुमारास बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी शवविच्छेदनसाठी तिघांचे मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले आहे. निळेगावातील रेल्वे कारशेडला लागून असलेल्या आनंद व्ह्यू इमारतीमधील सेप्टिक टँक स्वच्छ करण्यासाठी बिल्डरने सुपर वायझरला सांगितल्यानंतर साफसफाई व झाडू मारणाºयाला टँक सफाईकरिता २५ हजार रु पयाला ठेका देण्यात आला. गुरु वारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास ६ मजूर इमारतीमध्ये सेप्टिक टँक साफ करण्यासाठी गेले.
मिथेन व विषारी वायू गॅसमुळे बिका कॅसन बुंबक (२५), प्रदीप सरवटे मियायन (३५) आणि सुनील महासिंग अरवाल (३५) या तिघांचा सेप्टिक टँकमध्ये गुदमरु न मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वसई विरार मनपाच्या अग्निशामक दलाला पाचारण केले होते.
सुपरवायझरसह सात बिल्डरांवर गुन्हा
नालासोपारा पोलिसांनी सुपरवायझर अबुसमाद अबू सिद्धीकी शेख ताब्यात घेऊन मृतदेह शवविच्छेदनसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवून दिले. नालासोपारा पोलिसांनी बांधकाम व्यवसायिक रमेश भोरा, सुरेश जैन, पुष्कर जैन, धर्मेश जैन, विनोद जैन, नंदलाल दुबे, तेजप्रकाश मेहता आणि इतर भागीदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सदर घटनेप्रकरणी तिघांचा सेफ्टी टँकमध्ये गुदमरून मृत्यू झाला असून बांधकाम व्यवसायिकांविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला असून तपास करत आहे. - वसंत लब्दे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नालासोपारा पोलीस ठाणे
अशा घटना टाळण्यासाठी मनपाच्या हद्दीमधील सर्व इमारतींना यापुढे सेफ्टी टँक साफसफाई करण्यासाठी प्रॉपर उपाययोजना, योग्य ती काळजी घेण्यासाठी आदेश काढणार आहे. तसेच मनपाशी संपर्क साधला तर सक्शन पंप किंवा मशिनरी देण्यात येईल. - बळीराम पवार (आयुक्त, वसई विरार शहर महानगरपालिका)
कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे तिघांचे प्राण गेले असून त्यांचे परिवार उघडे पडले आहे. बिल्डरला तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही. - राजू कांगडा (अध्यक्ष, भारतीय मजूर साफसफाई मजदूर युनियन)