हवामान बदलामुळे झेंडूचे उत्पन्न मंदावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 11:31 PM2020-02-27T23:31:38+5:302020-02-27T23:31:41+5:30
हरभरा उत्पादन घटले; वाड्यामधील शेतकऱ्यांचा फुलशेतीकडे वाढला ओढा
वाडा : वाड्यातील गातेस गाव खरे तर हरभरा लागवडीसाठी प्रसिद्ध, मात्र लहरी हवामानामुळे हरभºयाचे चांगले उत्पन्न होत नाही. यामुळे गेल्या काही वर्षांपासून येथील शेतकरी झेंडूच्या फुलशेतीकडे वळले आहेत. या गावातील जवळपास १५ ते २० शेतकरी फुलशेती करतात. या ठिकाणी उत्पादित केलेल्या फुलांना सुरत आणि दादर येथे चांगली बाजारपेठ आहे. मात्र हवामानातील बदलामुळे यंदा झेंडूचे उत्पन्न मंदावले आहे.
स्थानिकांना आणि बेरोजगारांना औद्योगिकीकरणामुळे रोजगार मिळेल, अशी आशा होती. मात्र वाड्यातील कारखाने कधी उघडले आणि कधी बंद झाले हे लोकांना कळलेही नाही. आता लोकांनी दिलेल्या जागी फक्त बंद सांगाडे उभे असून बेरोजगारी ही समस्या कायमस्वरूपी वास्तव्यास राहिली. मात्र असे असतानाही गातेससारख्या गावातील शेतकरी व विशेषत: महिलांनी झेंडूची लागवड करून अस्सल मातीचा गंध आणि रंग आपल्या जीवनात आणला असून खूप फायदेशीर नसला तरी हक्काचा रोजगार उपलब्ध केला आहे.
गातेस खुर्द याच गावातील विशाखा पाटील यांनीही सहकारी रामचंद्र पाटील यांच्यासोबत १९ हजार झेंडूच्या रोपांची लागवड केली असून यासाठी त्यांना एक लाख रुपयांपेक्षा अधिक खर्च आला आहे.
डिसेंबर महिन्यात या रोपांची लागवड केली असून मार्च महिन्यापर्यंत फुलांचे उत्पन्न मिळणार आहे. दोन ते तीन दिवसांत त्यांना जवळपास १२०० किलो फुले तोडावी लागतात. ज्यांना सध्या २० ते २५ रुपये किलो दराने भाव मिळतो. खरे तर हा भाव म्हणजे निव्वळ चेष्टा असून असाच भाव राहिला तर मात्र यातून काहीही नफा मिळणे अवघड आहे.
चांगला भाव असला तर तीन महिन्यात एक ते दीड लाख रुपये निव्वळ नफा मिळतो. मात्र या वर्षी उशिरापर्यंत रेंगाळलेला पाऊस, सतत ढगाळ असलेले वातावरण यामुळे रोगराई व औषधोपचार यावर खर्च वाढून उत्पन्न देखील कमी होण्याची शक्यता विशाखा पाटील यांनी व्यक्त केली आहे.