सहा महिन्यापासून टॉवर बंद, मोबाइल नोट रिचेबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 11:47 PM2018-11-20T23:47:01+5:302018-11-20T23:47:33+5:30
डहाणू तालुक्याच्या सायवन भागातील गावासाठी सायवन येथे उभारलेला मोबाईल टॉवर सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच नेटवर्क नसल्याने सरकारी कार्यालयातील व बँकातील कामे ठप्प झाली आहेत.
- शशिकांत ठाकूर
कासा : डहाणू तालुक्याच्या सायवन भागातील गावासाठी सायवन येथे उभारलेला मोबाईल टॉवर सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच नेटवर्क नसल्याने सरकारी कार्यालयातील व बँकातील कामे ठप्प झाली आहेत.
तालुक्यातील आदिवासी भागातील सायवन येथे सात वर्षांपूर्वी परिसरात गावासाठी मोबाईल टॉवर उभारण्यात आला. मात्र, काही तांत्रिक अडचणीमुळे सदर टॉवर सहा महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे त्याच्या कार्यक्षेत्रात येणारी सायवन, चळणी, गांगोडी, निंबापूर, बांधघर, बापुगाव, शेणसरी, रामपूर, किन्हवली, दिवशी, दाभाडी या गाव पाड्यांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे मोबाईल फोन नोट रिचेबल तसेच सर्वच आॅनलाइन सह आरोग्य सेवा व बँकिंग सेवेवरही परिणाम झाला आहे.
सायवन येथे बँक आॅफ महाराष्ट्र, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आदी बँकांच्या शाखा आहेत. बँकांचे सर्व व्यवहार इंटरनेटमार्फत होतात. मात्र नेट नसल्याने बँकांचे व्यवहार पूर्णपणे विस्कळीत झाले आहेत. आर्थिक व्यवहारासाठी दररोज ग्राहकांच्या रांगा सकाळी आठ वाजेपासून ते संध्याकाळी चार वाजेपर्यं लागतात. वृद्ध, निवृत्ती वेतन धारक, महिला, विद्यार्थी, तासन तास रांगेत टाळकत उभे राहतात. कधीतरी पहिल्या दिवशी नंबर लागत नसल्याने. दुसऱ्या दिवशी पुन्हा फेºया माराव्या लागतात. त्यामुळे ग्राहक व बँक कर्मचारी यांच्यात सतत वाद होतात.
सायवन येथे सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्राअंतर्गत पंधरा गावे येतात. या परिसरातील संपूर्ण आदिवासी लोकवस्ती असून येथील नागरिक आरोग्य सेवेसाठी पूर्णपणे सायवन आरोग्य केंद्रावर अवलंबून आहे. मात्र गंभीर परिस्थितीत सर्पदंश, गर्भवती महिला अशा वेळी १०८ सारख्या रुग्णसेविका सेवेशी संपर्क करता येत नाही. तसेच परिसरातील शाळेतील शिक्षकांना वेळोवेळी विविध माहिती आॅनलाईन पाठवावी लागते. मात्र नेट नसल्याने मोठी अडचण होते. त्या साठी त्यांना दररोज पाच सहा किमी नेटवर्क असलेल्या भागात यावे लागते.
सायवन येथील ग्रामस्थांना निकडीच्या वेळेस गावापासून एक किमी पुढे उंच टेकडीवर जावे लागते. परंतु दरवेळेस रात्री अपरात्री येथे जाणे शक्य नाही. त्यामुळे तात्काळ मोबाईल टॉवर सुरू करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
सायवन भागात सहा महिन्यांपासून दूरध्वनी सेवा बंद आहे. त्यामुळे मोठी गैरसोय होते.
- रमेश मोरे, सायवन