धोकादायक रासायनिक कारखाने बंद करणार; उद्योगमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांसमवेत आज बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 01:47 AM2020-01-13T01:47:10+5:302020-01-13T02:27:11+5:30
तारापूरच्या रासायनिक कारखान्यांना अनेक वेळा सुधारण्याची संधी देण्यात आली. अगदी प्रकरण न्यायालयापर्यंत गेले, परंतु काही उपयोग झाला नाही,
बोईसर : ज्यात नागरिकांचा, कामगारांचा जीव जातो, असे उद्योग उपयोगाचे नाहीत. अशा प्रकारचे धोकादायक रासायनिक कारखाने सुरू ठेवायचे की नाहीत, याचा एकदाच काय तो निर्णय आता घ्यावा लागणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक बोलावली असून, त्यात काही धोरणात्मक निर्णय घेतले जातील, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी रविवारी पत्रकारांना सांगितले.
तारापूरच्या रासायनिक कारखान्यांना अनेक वेळा सुधारण्याची संधी देण्यात आली. अगदी प्रकरण न्यायालयापर्यंत गेले, परंतु काही उपयोग झाला नाही, असे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. तारापूरच्या स्फोटाची चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यांनी दुपारी तारापूर औद्योगिक वसाहतीत जाऊन स्फोटाच्या ठिकाणाची पाहणी केली. त्यानंतर ते बोलत होते. ही दुर्घटना धक्कादायक असून, माझी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची याबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल आम्हाला मिळाला असून, या प्रकरणाच्या सखोल चौकशीची गरज आहे. ती वरिष्ठ पातळीवरून होईल. त्यात जे जे जबाबदार असतील, मग ते कुठल्याही खात्याचे असोत, त्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. अशा प्रकारच्या दुर्घटना होऊ नयेत, यासाठी ज्या उपाययोजना करायच्या, त्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत निर्णय घेतले जातील, असे देसाई यांनी सांगितले.
वसईचे कार्यालय तारापूरला
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानग्यांचा आधार घेत, येथील कारखान्यात उत्पादन सुरू केले जाते. मात्र, ज्या उत्पादनासाठी परवानगी घेतली जाते, त्याऐवजी वेगळे उत्पादन घेतले जात असल्याची बाब यावेळी देसाई यांच्या निदर्शनास आणण्यात आली. असे धोकादायक उत्पादन घेणाऱ्या कारखान्याची जी नियमित तपासणी करण्याची गरज आहे, ती अपुºया अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे होत नाही. त्यासाठी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे कार्यालय वसईऐवजी तारापूरला आणावे, अशा सूचना केल्यानंतर देसाई यांनी कार्यालय त्वरित तारापूरला आणले जाईल, असे जाहीर केले, तसेच ज्या खात्याकडे मनुष्यबळ कमी आहे, त्यांना ते तत्काळ वाढवून दिले जाईल. यात विलंब होणार नाही, असे सांगितले.