वाड्यात कडकडीत बंद
By admin | Published: November 21, 2015 12:28 AM2015-11-21T00:28:14+5:302015-11-21T00:28:14+5:30
विविध मागण्यांसाठी माकपने सोमवारपासून वाडा प्रांत व तहसील कार्यालयांसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. मात्र, पाच दिवस उलटूनही प्रशासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्याने
वाडा : विविध मागण्यांसाठी माकपने सोमवारपासून वाडा प्रांत व तहसील कार्यालयांसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. मात्र, पाच दिवस उलटूनही प्रशासनाने या आंदोलनाची दखल न घेतल्याने माकपने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेऊन शुक्रवारी वाडा बंदची हाक दिली होती. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. वाडा बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मात्र, शासकीय कार्यालये सुरळीतपणे सुरू होती.
शुक्रवारी सकाळी पी.जे. हायस्कूल येथे छोटेखानी झालेल्या सभेत माकपच्या सर्वच नेत्यांनी भाजपा सरकारवर कडाडून टीका केली. वनाधिकार कायदा २००६ मध्ये मंजूर झाला. त्याची अंमलबजावणी २००८ मध्ये झाली.
मात्र, २०१५ पर्यंत लाखो आदिवासी बांधवांच्या नावावर वनपट्टे झाले नसून त्याला भाजपा सरकारच जबाबदार असल्याचा आरोप माकप नेत्या मरियम ढवळे यांनी या वेळी केला. येत्या काही काळात वनपट्टे कसणाऱ्यांच्या नावावर न केल्यास शासकीय कार्यालयातील काम चालू देणार नाही, असा गंभीर इशारा नेते अशोक ढवळे यांनी या वेळी जाहीर सभेत दिला. या आंदोलनात सुनील धानवा, राजा गहला, किरण गहला, अनिल पाटील, जगन म्हसे आदी नेत्यांसह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले. (वार्ताहर)