गटारी अमावस्येसाठी किनारपट्टी सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 12:23 AM2019-07-29T00:23:17+5:302019-07-29T00:23:47+5:30
रिसॉटर््स फुल्ल : पर्यटकांची फुल्ल टू धमाल
आशिष राणे
वसई : वसई तालुका हा सागरी किनारपट्टीने समृद्ध आहे, त्यामुळेच ३१ डिसेंबर असो वा अन्य काही सेलिब्रेशन, येथील रिसॉर्ट्सवर पर्यटकांची नेहमीच गर्दी दिसते. बुधवारी आलेल्या गटारीसाठी देखील आजूबाजूच्या जिल्ह्यातून पर्यटक वसई, पालघर तसेच डहाणूतील रिसॉर्ट्सवर गर्दी करतात.
१ आॅगस्टपासून श्रावण सुरू होत आहे. हा शेवटचा शनिवार-रविवार असल्याने हौशी पर्यटकांकडे मौजमजेसाठी ३ दिवस आहेत. यावेळी गटारी अमावस्या बुधवारी आल्याने शनिवारपासून थेट बुधवार, ३१ जुलैपर्यंत वसई तसेच पालघर जिल्ह्यातील हॉटेल्स बऱ्यापैकी फूल झालेली दिसतात. पालघर, डहाणू, वसई या समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांसाठी शेकडो हॉटेल्स, रिसॉर्ट, न्याहारी-निवास अशी व्यवस्था आहे. तिथे पर्यटकांची गर्दी असल्याने हे किनारे कलरफूल आणि यूथ फूल झाले आहेत. पाऊस पडत असताना ही गटारी अमावस्या साजरी करण्याचा मनमुराद आनंद पर्यटक लुटत आहेत. दरम्यान, पंधरा दिवसांपासून पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण तसेच शहरी भागात बºयापैकी पाऊस पडल्याने उकाडा कमी होऊन आता वातावरण बºयापैकी थंड आहे.
वसईतील पश्चिम पट्ट्यातील अर्नाळा, कळंब, राजोडी, वसई पूर्वेला आदी ठिकाणी तर पालघर तालुक्यात केळवे, माहीम, टेंभी, दातिवरे, मथाणे, एडवण, कोरे, भादवे-शिरगाव, आलेवाडी, नांदगाव, तारापूर, घिवली येथे हॉटेल्स, रिसॉर्ट्स, एमटीडीसीच्या न्याहरी निवासाच्या व्यवस्था आहेत. पालघर पट्ट्यात जास्त आदिवासी भाग आणि गावे असल्याने येथे गावरान मांसाहरी खाद्य पदार्थाला जास्त मागणी आहे.
हॉट स्पॉट वसई, अर्नाळा
वसई गावातील मच्छीची हॉटेल्स अथवा विरार नजीकचा अर्नाळा समुद्र किनारा हा मुंबईकर पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरतो. अर्नाळा किनारी १७, तर सत्पाळ्यात ३ रिसॉर्ट्स आहेत. येथील रिसॉटर््सना पूर्ण लायटिंग करण्यात येते. ३१ डिसेंबर सारखेच गटारीसाठीचे आयोजन असते.