कंत्राटी कामगारांनी बंद पाडले कोकाकोलाचे काम; प्रवेशद्वारासमोर कुटुंबासह आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 01:36 AM2020-12-01T01:36:53+5:302020-12-01T01:37:09+5:30
ठेकेदार बदलावरून सुरू आहे वाद, सेवा खंडित करण्यात कामगारांचा विरोध
वाडा : कोकाकोला कंपनीतील दोन ठेकेदारांचा ठेका कंपनीने रद्द केला असून या ठेकेदारांच्या १३१ कामगारांना दुसऱ्या ठेक्यात टाकण्यात आले आहे. पहिल्या ठेकेदाराचा राजीनामा देऊन पुन्हा नव्याने दुसऱ्या ठेकेदाराकडे काम करण्यास सुरुवात करावी, असे कंपनीचे म्हणणे आहे, तर पूर्वी केलेल्या कामाची सेवा खंडित न करता नवीन ठेकेदाराकडे काम करण्यास कामगार तयार आहेत. मात्र, कामगार व कंपनीचे एकमत होत नसल्याने संतापलेल्या कामगारांनी सोमवारी कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर कुटुंबासह आंदोलन सुरू करून कंपनीचे कामकाज बंद पाडले आहे.
तालुक्यातील कुडूस ग्रामपंचायतीच्या हद्दीत ''कोकाकोला''ही शीतपेयांचे उत्पादन करणारी कंपनी आहे. या कंपनीत शेकडो कामगार काम करीत आहेत. कंपनीत कायमस्वरूपी कामगार वगळता ३३० कंत्राटी कामगार आहेत. कंपनीत एकूण चार ठेकेदार होते. त्यातील दोन ठेकेदारांचा ठेका कंपनीने १ नोव्हेंबरपासून रद्द केला आहे. रद्द केलेल्या दोन ठेकेदारांकडे १३१ कामगार आहेत. या कामगारांना उर्वरित दोन ठेकेदारांच्या ठेक्यात टाकण्यात आले आहे. मात्र, कंपनीने कामगारांना पूर्वीच्या ठेकेदाराचा राजीनामा देऊन नवीन सुरुवात करण्यास सांगितले आहे. हे कंपनीचे धोरण कंत्राटी कामगारांना मान्य नसून पूर्वीची सेवा खंडित न करता नवीन ठेक्यात येण्यास कामगारांची तयारी आहे. कामगारांनी स्थानिक कामगार संघटनेच्या झेंड्याखाली कंपनी व्यवस्थापक, उपकामगार आयुक्त यांच्याकडे याबाबत न्याय मागितला. मात्र, त्यांना कुठलेही ठोस आश्वासन मिळत नसल्याने संतप्त झालेल्या कामगारांनी सोमवारी कुटुंबासह कंपनीच्या दोन्ही प्रवेशद्वारांसमोर ठिय्या मांडून आंदोलन सुरू करून येण्याजाण्याचा मार्ग अडविल्याने कंपनीचे कामकाज बंद पाडले आहे. दरम्यान, कंपनीचे व्यवस्थापक श्रीकांत गोरे यांच्याशी वारंवार दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
कंत्राटी कामगार गेल्या १८-२० वर्षांपासून कंपनीत काम करीत आहेत. त्यांची पूर्वीची सेवा खंडित केल्यास त्यांच्या आताच्या वेतनावर परिणाम होणार आहे. त्यामुळे एकही कामगार राजीनामा देणार नसून नव्याने नेमणूकपत्र स्वीकारणार नाहीत. न्याय मिळेपर्यंत कामगारांचे आंदोलन सुरू राहील. - राजेश सावंत, संयुक्त सचिव, स्थानिक कामगार संघ
कारखान्यात कंत्राटी कामगारांची संख्या उत्पादन गरजांच्या आधारे वेगवेगळी असते. जी हंगामी आणि आमच्या उत्पादकांच्या मागणीशी थेट जोडलेला आहे. या विषयावर लक्ष देण्यासाठी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करीत आहोत. आम्ही लवकरच हा विषय निकाली काढू. - श्रेयस शर्मा प्रसिद्धी अधिकारी, कोकाकोला कंपनी