पांढरी माशीच्या विळख्यात नारळबागा; सुपारी, केळी, पपईच्या झाडांवरही प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 12:54 AM2020-02-08T00:54:26+5:302020-02-08T00:54:44+5:30
जिल्हास्तरीय प्रशिक्षणात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन
डहाणू/बोर्डी : पालघर जिल्ह्याला वसई ते झाई हा सव्वाशे कि.मी.चा समुद्रकिनारा लाभला असून येथील वाळूमिश्रित जमीन, क्षारयुक्त पाणी आणि उष्ण-दमट हवामानामुळे नारळाची झाडे जोमाने वाढतात, मात्र अलीकडच्या काळात या परिसरातील नारळबागा स्पायरेलिंग पांढरी माशीच्या विळख्यात सापडल्या आहेत. ही कीड नारळाप्रमाणेच सुपारी, केळी, पपई व शोभेची झाडे आणि आता चिकूवरही वाढत असल्याने परिसरातील बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
पालघर जिल्ह्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात नारळाच्या झाडांची लागवड झालेली आहे. दहा वर्षांपूर्वी प्रती माड सरासरी २०० फळे प्रतिवर्षी मिळायची, मात्र रोगाच्या प्रादुर्भावाने हे उत्पादन निम्म्यावर आले आहे. परिणामत: झाडांची तोड करून नवीन लागवडीकडे बागायतदार पाठ फिरवताना दिसत आहेत. स्पायरेलिंग पांढरी माशी ही नारळ झाडाच्या पानांतून रस शोषून घेते. त्याच वेळी तिच्या शरिरातून चिकट, गोड पदार्थ बाहेर सोडते. त्यावर काळ्या रंगाची शुटी मोल्ड ही बुरशी पानावर वाढते.
या काळ्या बुरशीच्या वाढीमुळे पानांची प्रकाश संश्लेषण क्रिया थांबून अन्ननिर्मिती प्रक्रियेत अडथळा येऊन नवीन फुलाफळांचे प्रमाण कमी होते. ही कीड नारळाप्रमाणेच सुपारी, केळी, पपई व शोभेची झाडे आणि आता चिकूवर सुद्धा वाढत आहे. हा प्रादुर्भाव जिल्ह्यात मागील वर्षी मार्च महिन्यात घोलवड येथे प्रकाश अमृते यांच्या नारळ झाडांवर पहिल्यांदा प्रा. उत्तम सहाणे यांनी पहिला व जिल्ह्यात नोंद केली. याचा अहवाल कृषी विद्यापीठ दापोली येथे पाठवला होता.
नारळ पिकावरील समस्यांविषयी प्रशिक्षण : कृषी विज्ञान केंद्र कोसबाड आणि नारळ विकास बोर्ड पालघर यांच्यातर्फे नारळ पिकावरील विविध समस्यांविषयी जिल्हास्तरीय एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन कृषी विज्ञान केंद्र कोसबाड येथे नुकतेच केले होते. या वेळी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रा.उत्तम सहाणे आणि प्रा. भरत कुशारे यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा नारळ उत्पादक संघाचे अध्यक्ष यज्ञेश सावे, उपाध्यक्ष देवेंद्र राऊत यांच्यासह अनेक प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते.
नारळ पिकावर उद्भवलेल्या स्पायरेलिंग पांढरी माशी आणि इतर किडींच्या व्यवस्थापनाविषयी प्रा.उत्तम सहाणे मार्गदर्शन करताना म्हणाले की, या समस्येविषयी सामूहिक व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. बागायतीत मित्र कीटकांची संख्या वाढविण्यासह रासायनिकऐवजी जैविक कीटकनाशकांचा वापर आवश्यक आहे. तर प्रा. भरत कुशारे यांनी नारळ पिकामध्ये खत आणि पाणी व्यवस्थापन याबाबत माहिती दिली.
नारळ विकास बोर्डाचे उपसंचालक डॉ. देवनाथ यांनी नारळ उत्पादनातील समस्या आणि निवारण याविषयी मार्गदर्शन केले. प्रक्षेत्र अधिकारी शरद आगलावे यांनी पिकाची लागवड आणि प्रक्रि या याबद्दल शासकीय योजनांची माहिती दिली. या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील बागायतदार सहभागी झाले होते. त्यांनी विविध समस्यांबद्दल विचारलेल्या प्रश्नांना तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
या समस्येकरिता सामूहिक पद्धतीने व्यवस्थापन गरजेचे असून निम तेल ५ मि.लि. प्रति लिटरप्रमाणे फवारणी करावी. या किडीवर उपजीविका करणारे एन्कारशिया नावाचे मित्रकीटक शेतात वाढणे आवश्यक आहे. रासायनिक कीटकनाशकांचा वापर शक्यतो टाळून त्याऐवजी वनस्पतीजन्य आणि जैविक कीटकनाशकांचा वापर करावा.
- उत्तम सहाणे, कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड, पीक संरक्षणशास्त्रज्ञ.
स्पायरेलिंग पांढरी माशीचा प्रभाव चिकू झाडांवर दिसू लागला आहे. या जिल्ह्याचे अर्थकारण चिकू बागांवर अवलंबून आहे. त्यामुळे तातडीने उपाययोजना न अवलंबल्यास चिकू बागायतदार देशोधडीला लागेल.
- देवेंद्र राऊत (उपाध्यक्ष, जिल्हा नारळ उत्पादक संघ)