दांडेकर महाविद्यालयात ‘कॉफी विथ व्ही.सी.’
By admin | Published: January 15, 2017 05:08 AM2017-01-15T05:08:55+5:302017-01-15T05:08:55+5:30
ग्रामीण भागातील मुलांमध्ये गुणवत्ता ठासून भरलेली आहे, फक्त त्यांना दिशा देणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या मधील गुणवत्तापूर्ण ज्ञानाचा उपयोग समाजाभिमुख
- हितेन नाईक, पालघर
ग्रामीण भागातील मुलांमध्ये गुणवत्ता ठासून भरलेली आहे, फक्त त्यांना दिशा देणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या मधील गुणवत्तापूर्ण ज्ञानाचा उपयोग समाजाभिमुख दृष्टिकोन रुजविण्यासाठी केला पाहीजे, असा संदेश मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात आयोजित केलेल्या ‘कॉफी विथ व्ही.सी.’ या कार्यक्र मात विद्यार्थ्यांना दिला.
कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी भाषणाच्या सुरुवातीला आपला जीवन प्रवास उलगडून दाखवितांना आईवडीलांपेक्षा शिक्षकांची भूमिका महत्वपूर्ण असल्याचे सांगून आपले करिअर घडविण्यासाठी त्यांचा आधार घेण्याचा सल्ला दिला. आपण शिक्षण घेत असताना नेमक्या कोणत्या संधींचा लाभ घ्यायला पाहिजे, याचा विचार विद्यार्थ्यांनी करून आलेली संधी कधी दवडू नका असे सांगितले. स्वत:च्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
आयुष्यात मोठे होण्यासाठी प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आयुष्यात भेटणाऱ्या सर्व व्यक्तींकडून आपणास काहीतरी शिकणे शक्य आहे. याचे भान ठेवून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आयुष्य जगताना समाजाप्रती एक तळमळ असली पाहिजे. याचे भान प्रत्येक विद्यार्थ्यांने ठेवले पाहिजे, याची जाणीव त्यांनी विद्यार्थ्यांना करु न दिली.
मुंबई विद्यापीठातर्फे ‘कॉफी विथ व्ही.सी.’ हा कार्यक्रम सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात काल आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्र मास पालघर जिल्हयातील आणि विद्यापीठाच्या पश्चिम भागातील ६० महाविद्यालयातील २००० विद्यार्थी, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची समर्पक उत्तरे डॉ. संजय देशमुख यांनी दिली.
मधमाशीचे समर्पक उदाहरण : मधमाशी काटेरी आणि बिनकाटेरी अशा दोन्ही झाडांच्या फुलांमधून मध गोळा करीत असते. मधमाशीला एक ग्रॅम मध गोळा करण्यासाठी शेकडो झाडे धुंडाळावी लागतात. त्यामुळे आयुष्यात काही बनण्यासाठी मधमाशीसारखी मेहनत करायला आपण शिकले पाहिजे. शिक्षणाची कास धरतांना पदव्युतर शिक्षण पूर्ण करीत अशी उत्तुंग झेप घ्या की, ज्यामुळे तुमच्या आईवडीलांना व समाजाला तुमचा अभिमान वाटेल, तुमचे नशीब तुम्हालाच घडवावे लागेल, हे लक्षात ठेवून वाटचाल करण्याचा प्रयत्न करा, असा ही सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
देशातील पहिलाच उपक्रम
१कॉफी विथ व्ही.सी. हा मुंबई विद्यापीठ तसेच देशातील अशा प्रकारचा एक वेगळया स्वरु पाचा पहिलाच उपक्र म कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांच्यातर्फे राबविण्यात येत आहे. ज्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या ७५० पेक्षा जास्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद होणार आहे.
२पालघर जिल्ह्यासाठी दांडेकर महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्र मात ६० महाविद्यालयातील २००० विद्यार्थ्यांचा सहभाग. अविरतपणे साडेतीन तासापेक्षा जास्त वेळ विद्यार्थ्यांशी संवाद, विद्यार्थी मंत्रमुग्धतेने त्याचा आनंद घेत होते. विद्यार्थ्यांच्या भावनांना हात घालून त्यांच्या उज्वल भवितव्यासाठी तळमळीने आवाहन केले. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांबरोबर सेल्फी काढून घेत विद्यार्थ्यांशी मनमोकळा अनौपचारिक संवादही साधला.