तलासरी-डहाणूत भूकंपाबरोबर थंडीचा कडाका वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 11:15 PM2019-12-15T23:15:51+5:302019-12-15T23:15:56+5:30
थंडीत घराबाहेरील मांडवात काढावी लागते रात्र : विंचू-सापांच्या दंशाची भीती, स्थानिकांचा जीव मेटाकुटीला
तलासरी : तलासरी-डहाणू तालुक्यातील गावात सुरू असलेले भूकंपाचे धक्के कमी होण्याची काही लक्षणे दिसत नाहीत. सततच्या धक्क्याने ग्रामस्थ घराबाहेर थंडीवाऱ्यात मांडवात झोपत आहेत. पण सध्या या भागात थंडीचाही कडाका वाढल्याने घराबाहेर रात्र थंडीत काढताना जीव मेटाकुटीला येत आहे.
तलासरी-डहाणूच्या भागात भूकंपाचे धक्के सतत बसत असताना शासकीय यंत्रणा मात्र झोपेत असल्याचा आरोप स्थानिक करीत आहेत. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने भूकंपाचा धक्का बसताच घराबाहेर पडून सुरक्षित स्थळी जायचे, पण दररोज रात्री बसणाºया धक्क्यांमुळे जीवावर बेतण्याची भीती असल्याने स्थानिकांना घराबाहेरच झोपावे लागत आहे. घराबाहेर राहावे लागत असल्याने घरातील संपत्ती चोरीची आणि बाहेर उघड्यावर झोपावे लागत असल्याने विंचू-सापांचे भय असून ग्रामस्थ रात्र-रात्र जीव मुठीत धरून काढत आहेत.
गाव-पाड्यात मार्गदर्शन शिबीर घेण्यात येऊन भूकंपाबाबत माहिती देण्यात आली. त्यात भूकंपाच्या वेळी घेण्याची खबरदारी लोकाना सांगण्यात आली. त्यानंतर शासकीय यंत्रणा पुन्हा झोपी गेली तरी भूकंपप्रवण क्षेत्रातील लोकांना काही झोप येत नाही. स्थानिक लोक रात्र-रात्र जागून काढत आहेत. घराबाहेर थंडीचा पारा चढला आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी घरात झोपावे तर भूकंपाच्या धक्क्याने घर कोसळून जीव जाण्याची भीती तर भूकंपाचा धक्का बसताच लहान मुले दचकून घाबरून झोपेतून उठून रडत बसत आहेत. अनेकांच्या घरांना तडे गेल्याने ती कधीही कोसळून पडण्याची भीती आहे. या भीतीने ग्रामस्थ घराबाहेर तात्पुरता मांडव टाकून रात्र काढत आहेत. पण वाढत्या थंडीचे काय? थंडी अन् आभाळातून पडणारा दव याने रात्र बाहेर काढणे अवघड झाले आहे.
डहाणूत भूकंपाचा दुसरा बळी; नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण
डहाणू : पालघर जिल्ह्यात धुंदलवाडी येथे शुक्रवारी मध्यरात्री भूकंपाचा २.६० रिस्टर स्केलचा तीव्र धक्का बसल्यानंतर लागोपाठ ४-५ धक्के बसल्यामुळे जनतेने मध्यरात्री सुरक्षिततेचा उपाय म्हणून घराबाहेर थांबणे पसंद केले. त्याआधी डहाणू तालुक्यातील नागझरी, वसावलापाडा येथील रिश्या मेघवाले (५५) यांच्या अंगावर घर कोसळल्यामुळे त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला होता तसेच भूकंपाने पळत सुटलेली एक मुलगीदेखील मृत पावलेली होती. त्यामुळे डहाणूत भूकंपाचे आतापर्यंत दोन बळी गेले आहेत. विशेष म्हणजे भूकंप परिस्थितीत निवारा असलेले तंबूही गायब झाले आहेत. तसेच एनडीआरएफची टीमही रवाना झाल्याने सरकारने जनतेची सुरक्षा वाºयावर सोडल्याची भावना व्यक्त होत आहे.
डहाणूतील नागझरी येथील रिश्या दामा मेघवाले ही महिला झोपेत असताना भूकंपाच्या जोरदार धक्क्याने कौलारू आणि कुडाच्या भिंती असलेले घर अंगावर कोसळल्याने मृत्यू पावली होती. बुधवारी रात्री १.०० च्या सुमारास ही घटना घडली होती. यानंतर डहाणू तलासरी परिसरात शुक्रवारी मध्यरात्री व शनिवारी दोन दिवस भूकंपाचे धक्के बसले. त्यामुळे या परिसरातील सर्व नागरिक घराबाहेर पडले. तर काहींनी रात्र घराबाहेर रस्त्यावर जागून काढली. या परिसरातील नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत.