काेराेनाच्या सावटामुळे यंदा सामूहिक प्रार्थना रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2020 01:31 AM2020-12-08T01:31:34+5:302020-12-08T01:32:06+5:30
Vasai News : २५ डिसेंबरला असलेल्या नाताळ सणाच्या आधी डिसेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या रविवारी जांभळी, तिसऱ्या रविवारी गुलाबी रंगाची मेणबत्ती प्रज्वलित करून, येशू ख्रिस्ताच्या आगमनाचा संदेश चर्चमधून दिला जातो.
वसई : ख्रिस्त आगमनाच्या काळाला यंदा नोव्हेंबरच्या शेवटच्या रविवारपासून सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर वसईतील चर्चमध्ये काेराेनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित सामाजिक अंतर व नियम पाळून जांभळ्या मेणबत्तींचे विधिवत प्रज्वलन करण्यात आले. यंदा काेराेनाचा धाेका टाळण्यासाठी सामूहिक मिस्सा (प्रार्थना) रद्द करण्यात आल्या आहेत.
२५ डिसेंबरला असलेल्या नाताळ सणाच्या आधी डिसेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या रविवारी जांभळी, तिसऱ्या रविवारी गुलाबी रंगाची मेणबत्ती प्रज्वलित करून, येशू ख्रिस्ताच्या आगमनाचा संदेश चर्चमधून दिला जातो. त्यानंतर, २४ डिसेंबरच्या मध्यरात्री प्रभू येशू जन्माच्या वेळी पांढऱ्या रंगाची मेणबत्ती प्रज्वलित करून ख्रिस्त जन्मोत्सव साजरा केला जातो. यंदा नोव्हेंबरच्या शेवटच्या रविवारी आगमन काळाला सुरुवात झाली. त्या निमित्त वसईच्या विविध चर्चमध्ये जांभळ्या रंगाची मेणबत्ती प्रज्वलित करण्यात आली. ख्रिस्ती श्रद्धेनुसार जांभळा रंग हा आशेचा रंग आहे. येशू जन्माच्या ७०० वर्षेआधी संदेशाद्वारे येशूच्या जन्माचे भाकीत करून तत्कालीन लोकांना पापमुक्ती आणि तारणाची आशा दिली होती. त्याचेही प्रतीक म्हणून ही मेणबत्ती प्रज्वलित केली जाते.
मेणबत्ती स्वत: जळून इतरांना प्रकाश देते, तसेच समाजातील प्रत्येक व्यक्तीने त्यातून बोध घेऊन इतरांसाठी जगण्याच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. ही मेणबत्ती प्रभू येशूचा प्रकाश, नकारात्मक विचारांनी व्यापलेल्या भोवतालात सकारात्मक प्रकाशाची दिशा आहे, असेही आगमन काळातील मेणबत्तीचे महत्त्व आहे.
ख्रिस्तप्रसाद चर्चच्या बाहेर
ख्रिस्ती धर्मात सामूहिक मिस्सा (प्रार्थना) केली जाते. सध्या कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा धोका असल्याने सामूहिक मिस्सा रद्द केल्या असल्याची माहिती वसईचे धर्मगुरू फादर मॉन्सेनिअर कोरिया यांनी दिली. ठरावीक भाविकांच्या उपस्थितीत मिस्सा करण्यात येत आहे. यंदा कोरोनामुळे चर्चमध्ये देण्यात येणारा ख्रिस्तप्रसाद भाविकांनी चर्चच्या बाहेर जाऊन घ्यायचा आहे, तसेच चर्चमध्ये प्रार्थना करताना सामाजिक अंतर व गर्दी न करण्याचे आवाहनही धर्मगुरूंनी केले आहे.