प्रचाराला भरू लागला रंग!

By admin | Published: June 8, 2015 10:46 PM2015-06-08T22:46:06+5:302015-06-08T22:46:06+5:30

प्रचाराला आता चारच दिवस उरले असून वेगवेगळ्या पक्षांच्या मातब्बर नेत्यांच्या दौऱ्यांमुळे प्रचाराला रंगत भरू लागली आहे.

Color to fill the promotion! | प्रचाराला भरू लागला रंग!

प्रचाराला भरू लागला रंग!

Next

दिपक मोहिते, वसई
प्रचाराला आता चारच दिवस उरले असून वेगवेगळ्या पक्षांच्या मातब्बर नेत्यांच्या दौऱ्यांमुळे प्रचाराला रंगत भरू लागली आहे. काँग्रेसच्या वतीने रविवारी आॅस्कर फर्नांडीसांचा रोड-शो आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारा दौरा झाला. त्यांच्या रुपाने केंद्रीय माजी मंत्री महापालिका निवडणुकीच्या प्रचारात प्रथमच सहभागी झाले. आता काँग्र्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई मंगळवारी आणि बुधवारी प्रचारास येणार असून प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे मंगळवार आणि बुधवार असे प्रचारासाठी येणार आहेत. दलवाई हे फर्नांडीस यांच्या समवेतही रविवारीही होते. काल ते येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भेटले, त्यांच्या अडचणी ऐकल्या परंतु या निवडणुकांमध्ये पक्ष कार्यकर्त्यांनी कसे काम करावे याबाबत त्यांच्याकडून मार्गदर्शन झाले. मोदी सरकार व त्यांचे अपयश यावरच त्यांचा भर होता. उमेदवारांना र्धैर्य व कार्यकर्त्यांना मानसिक बळ यथाशक्ती देण्याचे काम त्यांच्याकडून होईल, अशी अपेक्षा होती, ती सार्थ ठरली. यंदा निवडणुकीच्या रिंगणात ८ ते १० पक्ष उतरले असले तरी, खरी लढत बहुजन विकास आघाडी व सेना-भाजपा युतीत होत आहे. मनुष्यबळ, साहित्य, केलेली विकासकामे आदी बहुजन विकास आघाडीची जमेची बाजु आहे. तर दुसरीकडे विरोधक पाण्याच्या प्रश्नाचे दाहक वास्तव प्रचारादरम्यान जनतेसमोर उपस्थित करीत आहेत. आज सकाळी पुन्हा पावसाची रिपरीप सुरू झाल्यामुळे उमेदवारांची तारांबळ उडाली. पाऊस थांबला आणि उमेदवारांचा जीव भांड्यात पडला.
युतीची जाहीर सभा नालासोपारा पूर्वेस पार पडली. आता लवकरच बहुजन विकास आघाडीची जाहीर सभा वसई पश्चिमेस माणिकपूर क्रिकेट मैदानात होण्याची शक्यता आहे. या सभेत इतर पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे इनकमिंग होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुमारे ७ लाख मतदार येत्या १४ तारखेला १११ नगरसेवक निवडणार आहेत. बहुजन विकास आघाडीच्या प्रचारामध्ये आमदार हितेंद ठाकूर, आमदार क्षितीज ठाकूर, आमदार विलास तरे, माजी खासदार बळीराम जाधव, राजीव पाटील आदी ज्येष्ठ नेते सहभागी होत आहेत. तर दुसरीकडे युतीच्या प्रचारामध्ये खासदार चिंतामण वनगा, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, भाजपचे नेते राजन नाईक, सेनेचे संपर्क प्रमुख अनंत तरे, जिल्हाध्यक्ष शिरीष चव्हाण, सेनेचे महानगरपालिकेतील गटनेते वसंत वैती यांनी प्रचाराचा भार आपल्या खांद्यावर घेतला आहे. प्रचार संपायला केवळ ६ दिवस उरले आहेत. या सहा दिवसात प्रत्येक उमेदवार मतदारसंघ पिंजून काढण्याच्या तयारीत आहेत. यावेळी निवडणूक शाखेचे अधिकारी देखील आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर काटेकोरपणे लक्ष देत आहेत. दुसरीकडे पोलिसांनी जागोजागी तपासणीनाके उभारून वाहनांची तपासणी सुरू केली आहे.
उमेदवारांना दैनंदिन खर्च निवडणूक कार्यालयात दररोज सादर करण्याच्या सूचना असल्यामुळे त्यांची धावपळ उडत आहे. हा खर्च लिहीणे व त्याचा ताळेबंद कार्यालयाला पाठवणे या कामामध्ये वेळ वाया जात असल्याने अनेक उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
यंदा झेंडे व फलक कार्यालयावर लावण्यास मज्जाव करण्यात आल्यामुळे साऱ्या राजकीय पक्षांमधून नाराजी व्यक्त होत आहे. प्रचार संपण्यास केवळ चार दिवस उरल्यामुळे सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार व पदाधिकारी दिवसरात्र परिश्रम घेत आहेत.
निवडणुकीसाठी नवी मुंबई, मिरा-भार्इंदर व अन्य शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. परंतु निवडणुकीचे ठिकाण घरापासून लांब असल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी दांडी मारण्याचे बेत आखले आहेत. त्याचा परिणाम मात्र निवडणूक प्रक्रियेवर होण्याची शक्यता आहे. दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत निवडणूक यंत्रणेकडून देण्यात आले आहेत. परंतु, प्रत्यक्षात तशी कारवाई न झाल्याने कारवाईच्या संकेतांचा कोणताही परिणाम दांडी बहाद्दरांवर झाल्याचे आढळून आलेले नाही.
----------
१२ जूनला सायंकाळी ५ वाजता प्रचार संपल्यानंतर पोलींग एजंट, मदतनीस यांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्यानंतर मतमोजणी केंद्रावरही आवश्यक ते प्रतिनिधी ठेवणे, अचानक उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी उमेदवारांचा प्रतिनिधी नियुक्त करणे आदी कामे करावी लागणार आहे. मतदानासाठी केवळ सहा दिवस उरले असल्याने निवडणूक शाखेच्या अधिकाऱ्यांचीही लगभग सुरु झाली आहे. ज्या कर्मचाऱ्यांना या कामी नियुक्त करण्यात आले आहे त्यापैकी अनेकांनी दांडी मारल्यामुळे अधिकाऱ्यांची तारांबळ उडत आहे.

Web Title: Color to fill the promotion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.