वाड्याच्या रंगीबेरंगी गोधड्यांची परदेशात विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 04:02 AM2017-07-20T04:02:02+5:302017-07-20T04:02:02+5:30
तानसा खोऱ्यातील गोर गरीब महिलांना रोजगार मिळावा म्हणून एका परदेशी महिलेने वाडा तालुक्यातील निंबवली येथे सुरू केलेल्या हस्तकला केंद्रातील गोधड्या,
- वसंत भोईर । लोकमत न्यूज नेटवर्क
वाडा : तानसा खोऱ्यातील गोर गरीब महिलांना रोजगार मिळावा म्हणून एका परदेशी महिलेने वाडा तालुक्यातील निंबवली येथे सुरू केलेल्या हस्तकला केंद्रातील गोधड्या, कापडी पिशवी, पर्स, शाल आदींना विदेशात प्रचंड मागणी आहे.
येथे अनेक कापडी वस्तू बनविल्या जात आहेत. व त्या परदेशात विकल्याही जात आहेत. या रंगीबेरंगी व आकर्षक वस्तूंना तेथे भरपूर मागणी असून भावही चांगला आहे. आठ ते दहा हजार रु पयांत एक गोधडी विकली जाते. त्यामुळे वाड्याची गोधडी सातासमुद्रापार गेली असून ती लोकिप्रय होत आहे.
जेनेटा मोनोसेफ या महिलेने १९८६ साली नित्यानंद एज्युकेशन ट्रस्टची स्थापना केली. या ट्रस्टद्वारे तिने हे हस्तकला केंद्र सुरू केले. यात कापडी चिंध्यापासून गोधडी, शाल, पर्स, बॅगा, जॅकेट, पायपुसण्या, कपड्याची मनीची माळ, पिशव्या, हार, झिगझॅग डबे, मोबाईल पाऊच, टोप्या, उशांची कव्हरे, वारली पेंटींग्ज यांचे उत्पादन केले जाते. त्यापैकी वस्तू ८० टक्के परदेशात विकल्या जातात. मागणीनुसार मालाचे उत्पादन केले जाते.
विशेष म्हणजे गोधड्या या रंगीबेरंगी असून आकर्षक असतात. गोधडीची डिझाईन या केंद्रातील महिलाच ठरवतात. साधारणपणे ९० बाय १०० किंवा ११० बाय ११५ इंच आकाराची गोधडी बनवली जाते. एका गोधडीसाठी पंधरा दिवसाचा कालावधी लागतो. या कलात्मकतेला परदेशात चांगली व सातत्यपूर्ण मागणी आहे.
चाळीस महिलांना रोजगार
या हस्तकला केंद्रात परिसरातील सुमारे ४० महिला कार्यरत आहेत. विशेष म्हणजे त्यापैकी चार पाच जणी अपंग असूनही त्या येथे कार्यरत आहेत. गरीब महिलांना रोजगार देणे हाच खरा उद्देश या केंद्राचा असल्याचे संस्थापक संचालिका जेनेटा मोनोसेफ यांनी सांगितले.
त्या व त्यांचे पती हे या केंद्रात विना मानधनावर काम करतात. या केंद्रात ना नफा ना तोटा या तत्वावर वस्तू विकल्या जातात. चिंध्या, वस्तू, शिलाई खर्च व मजुरी यांचा हिशोब करून त्याची रक्कम ठरवली जाते असे जेनेटा यांनी सांगितले. त्यांचे परिसरात कौतुक होत आहे.
३२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती; चार विद्यार्थी दत्तक : हस्तकला केंद्राबरोबरच तज्ज्ञ असलेल्या मार्गदर्शकाकडून शेतीची माहिती शेतकऱ्यांना दिली जाते. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले जाते. ते तंत्र कसे वापरावे, उत्पादन कसे काढावे याची माहिती आणि मार्गदर्शन दिले जाते. याचबरोबर या परिसरातील ३२ विद्यार्थाना दहावी ते उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती या संस्थेकडून दिली जाते. चार गरीब मुले या संस्थेने दत्तक घेतली आहेत. येथील शाळांत दरवर्षी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते. गेल्या ३१ वर्षात नित्यानंद एज्युकेशन ट्रस्ट तानसा खो-यात विविध उपक्र म राबवित आहेत.